मनपातील सत्तेचा फॉर्म्युला झेडपीतही 

विकास कांबळे - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - महापालिकेच्या राजकारणात स्थायी समितीच्या निवडणुकीपासून नव्याने तयार झालेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीचा फॉर्म्युला झेडपीच्या निकालानंतर राबविण्याच्या हालचाली आतापासूनच सुरू झाल्या आहेत. महापालिकेचे राजकारण ज्या नेत्यांच्या हातात आहे, तीच मंडळी जिल्हा परिषदेच्याही राजकारणात आघाडीवर असल्यामुळे भाजपला रोखण्यासाठी ही नवी आघाडी उदयास आली आहे. 

कोल्हापूर - महापालिकेच्या राजकारणात स्थायी समितीच्या निवडणुकीपासून नव्याने तयार झालेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीचा फॉर्म्युला झेडपीच्या निकालानंतर राबविण्याच्या हालचाली आतापासूनच सुरू झाल्या आहेत. महापालिकेचे राजकारण ज्या नेत्यांच्या हातात आहे, तीच मंडळी जिल्हा परिषदेच्याही राजकारणात आघाडीवर असल्यामुळे भाजपला रोखण्यासाठी ही नवी आघाडी उदयास आली आहे. 

महापालिकेच्या निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्तेसाठी कॉंग्रेस आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ एकत्र आले. त्यांनी महापालिकेतील पदे वाटप करून घेतली. मात्र, काटावरचे बहुमत असल्यामुळे आणि प्रथमच भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडीच्या माध्यमातून प्रबळ विरोधक उभा ठाकल्याने दोन्ही कॉंग्रेसला सध्या तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा फोडाफोडीच्या राजकारणाला सुरवात झाली. या निवडणुकीत कॉंग्रेसचा एक सदस्य विरोधकांच्या गळाला लागल्यामुळे निवडणुकीमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली होती. कॉंग्रेस, राष्ट्रवादीने आपली सत्ता टिकविण्यासाठी ऐनवेळी शिवसेनेची मदत घेतली. त्यामुळे त्यांचा स्थायी समिती सभापती होऊ शकला. या बदल्यात त्यांनी शिवसेनेला परिवहन समिती सभापतिपद बहाल केले. 

महापालिकेच्या राजकारणात सत्तेवर असणारे नेतेच जिल्हा परिषदेच्या राजकारणातही आघाडीवर आहेत. आमदार मुश्रीफ हे तर राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आहेत. त्यांच्यासोबत असणारे कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील देखील जिल्ह्याच्या राजकारणात आघाडीवर आहेत. दोघांनीही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी पायाला भिंगरी बांधली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जिल्हा परिषदेतही कोणा एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी शक्‍यता नाही. 

हालचाली सुरू 
जिल्ह्यात काही ठिकाणी ज्या आघाड्या झाल्या आहेत, त्या आघाड्या कोणाच्या पाठीशी राहणार हे आघाडी करणाऱ्यांनाही माहीत नाही. राष्ट्रवादीने तर शाहूवाडीत शिवसेनेसोबत आघाडी केली आहे. काही ठिकाणी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेसोबत युती केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करत असताना सगळ्यांचाच कस लागणार आहे. महापालिकेसारखीच या वेळी जिल्हा परिषदेतही परिस्थिती होण्याची शक्‍यता असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादीने निकालानंतर शिवसेनेसोबत जुळवून घेण्यासाठी आतापासूनच हालचाली सुरू केल्या असल्याचे समजते.

Web Title: Municipal power Formula in zp