साताऱ्यात कोट्यवधींच्या मिळकती वापराविना

साताऱ्यात कोट्यवधींच्या मिळकती वापराविना

सातारा - राजवाडा, प्रतापगंज, कमानी हौद अशा मध्यवर्ती ठिकाणी असलेले सहा हजार चौरस फूट एकूण क्षेत्र असलेले चार हॉल व दहा दुकान गाळ्यांचे गेली दोन ते पाच वर्षे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. काही कोटी रुपये खर्चून बांधलेल्या, पालिकेच्या मालकीच्या या इमारती वापराविना पडून आहेत. ‘सरकारी काम अन्‌ सहा महिने नव्हे सहा वर्षे थांब,’ अशी नवी म्हण रुढ होऊ पाहते आहे. चौकशी करायचीच असेल तर या सर्वच कारभाराची चौकशी झाली पाहिजे. दोन्ही नेत्यांनी मोठ्या विश्‍वासाने पालिका पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली. मात्र, गेल्या दहा वर्षांत पदाधिकाऱ्यांना पाठपुरावा करता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

मंगळवार तळ्यावरील नियोजित वाचनालय इमारतीचा महत्त्वाचा मुद्दा कालच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक वसंत लेवे यांनी उपस्थित केला आणि एका वेगळ्या विषयाला वाचा फुटली. सातारा शहरात पालिकेने रोजगाराला चालना देण्यासाठी विविध इमारती गेल्या दहा वर्षांत बांधल्या. यातील काही इमारती बांधल्यापासून वापरात नाहीत. 

भवानी पेठ मंडई
भवानी पेठ मंडईत पार्किंग, भाजी विभाग, फळविक्रेता विभाग व बहुउद्देशीय हॉल अशी इमारत बांधण्यात आली. फळविक्रेता विभागात विक्रेते बसण्यास तयार नाहीत. तिसऱ्या मजल्यावर सुमारे चार हजार चौरस फुटांचा हॉल बांधण्यात आला आहे. बांधकाम होऊन तीन वर्षे झाली. अद्याप हॉल वापरात आलेला नाही. चांदणी चौकात राजीव गांधी बहुउद्देशीय हॉलची इमारत बांधून चार वर्षे लोटली. या ठिकाणच्या गाळ्यांचा लिलाव अद्याप झालेला नाही. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर एकूण सुमारे ५०० चौरस फूट हॉल आहे. त्याचेही भाडे ठरलेले नाही. 

प्रतापगंजमध्ये नऊ गाळे
प्रतापगंज पेठेत, महावितरण कंपनीच्या पिछाडीस पालिकेच्या मालकीचे नऊ दुकान गाळे व सुमारे एक हजार चौरस फुटांचा हॉल असलेली इमारत आहे. पालिकेच्या विद्यमान ५० टक्के सदस्यांना ही मालमत्ता पालिकेची आहे, हेच माहिती नाही. अधिकाऱ्यांनादेखील त्याची कितपत माहिती आहे? याबाबत शंका आहे. खासगी मालकाने आरक्षण विकसित करून नऊ दुकान गाळे व हा हॉल पालिकेला दिला. त्याचे भाडे न ठरल्याने दोन वर्षांपूर्वी इमारत बांधून पूर्ण झाली; पण अजून पालिकेच्या मालकीच्या ताब्यातील मालमत्ता वापरात नाही. 

गुरुवार पेठेत जीम
कमानी हौदामागे, सुमारे ५०० चौरस फुटांत दोन गाळे पालिकेने बांधले आहेत. त्याच्यावर दोन मजले खासदार फंडातून बांधण्यात आले आहेत. या हॉलमध्ये जीम सुरू करावयाची आहे. मात्र, त्याला क्रीडा विभागाकडून साहित्य मिळालेले नाही. २०१४-१५ मध्ये ही इमारत बांधून तयार आहे. ७२ लाख रुपये इमारतीसाठी खर्ची पडले आहेत. 

‘आधीच उल्हास, त्यात...’
मालमत्तेचे भाडे निश्‍चित झाल्याशिवाय पालिकेस लिलाव करता येत नाही. ही भाडेनिश्‍चिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली त्रिसदस्यीय समिती करते. सहायक संचालक नगररचनाकार व मुख्याधिकारी हे या समितीचे इतर दोन सदस्य असतात. सातारा पालिकेने भाडेनिश्‍चितीसाठी प्रस्ताव पाठवून दीड वर्ष उलटले. नेमकी कोणाला सवड नाही, कळत नाही. मात्र, भाडेनिश्‍चिती काही होत नाही. आधीच या इमारती बांधून दोन ते चार वर्षांचा कालापव्यय झाला आहे. ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास,’ अशी सरकारी कामाची अवस्था झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com