esakal | उघड्यावर गेला, शंभराचा दंड झाला 

बोलून बातमी शोधा

 A municipal team fined one hundred rupees while urinating at public place

सांगली येथील प्रभाग क्रमांक तेरामध्ये बायपास रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी लघूशंका करताना महापालिकेच्या पथकाने एकाला शंभर रुपयांचा दंड आकारला.

उघड्यावर गेला, शंभराचा दंड झाला 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः येथील प्रभाग क्रमांक तेरामध्ये बायपास रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी लघूशंका करताना महापालिकेच्या पथकाने एकाला शंभर रुपयांचा दंड आकारला. त्याची पावती फेसबुक सारख्या समाज माध्यमातून सध्या चांगलीच पसरली आहे.

"स्वच्छ सांगली, माझी सांगली' उपक्रमांतर्गत महापालिकेने स्वच्छतेबाबत आग्रही भूमिका घेतल्याचे स्वागत होतेय, सोबतच लोकांना स्वच्छतागृह उपलब्ध करून न देताच कारवाई केली जात असल्याबद्दल नाराजीचाही सूर आहे. विशेषतः महिला स्वच्छतागृहाबाबत अनेक वर्षे संघर्ष करून महापालिकेला जाग येत नाही, हे अधिक गंभीर आहे. 

महापालिकेच्या स्वच्छतेसाठीच्या प्राधीकृत अधिकाऱ्याने शंभर रुपये दंड केल्याची पावती सध्या चर्चेत आली आहे. याआधी डॉमिनोज पिझ्झा सारख्या जागतिक ब्रॅंडला उघड्यावर कचरा टाकल्याबद्दल तीन हजारांचा दंड करण्यात आला होता. डॉक्‍टरांवरही कारवाई झाली आहे. त्यामुळे महापालिका जागृतपणे काम करतेय, हा संदेश पोहोचलाय. त्याबद्दल अनेकांनी स्वागतही केले आहे, मात्र लघुशंकेसाठी स्वच्छतागृहांची जागोजागी उपलब्धता करून देणे ही जबाबदारी कुणाची, हा प्रश्‍नही गांभीर्याने चर्चेला आला आहे. 

सांगली शहरातील गणपती पेठ, कापडपेठ, हरभट रस्ता, मारुती रस्ता या ठिकाणी स्वच्छतागृह आहेत का? येथे महिलांची संख्या प्रचंड असते. त्यांच्या आरोग्याचे प्रश्‍न केवळ या कारणानेही निर्माण होत असल्याचे अहवाल आहेत. त्यानंतरही महापालिकेने का पुढाकार घेतला नाही. मिरज येथे मार्केटला एक स्वच्छतागृह आहे. विजापूर वेस, गणपती तळ्याचा रस्ता, महात्मा गांधी चौक येथे काय अवस्था आहे? याबाबत मनपाने गांभीर्याने विचार करावा, एवढीच अपेक्षा अनेकांना समाज माध्यमातून त्या पावतीच्या पोस्टला उत्तर देताना व्यक्त केली आहे. 

सोशल प्रतिक्रिया 

  • कुपवाड रस्त्यावर एखादे तरी लघुशंकागृह आहे का? लोकांनी काय करायचे? : स्वप्नील खोत 
  • सांगली, मिरज, कुपवाड शहरात किती स्वच्छतागृह आहेत, हे लोकेशनसह टॅग करावे. लोकांची आधी सोय बघा : महेश थोरात 
  • स्विपर कॉलनी मिरजेत शौचालय आहे, तेथे बाहेर लोक लघुशंका करतात... अशांना आधी दणका द्या : अमजद जमादार 
  • हरभट रोडला स्वच्छतागृह करा, मग दंड सुरू करा : प्रवीण माने 
  • शहर स्वच्छतेसाठी घेतलेल्या सर्व निर्णयांचे स्वागतच : सुनील माळी 
  • हे अति झाले. महापालिकेतील इमारतीचे कोपरे बघा, खिडक्‍या बघा, सगळीकडे लाल झाले आहे. त्यांना किती दंड करणार? : पुरुषोत्तम भिंगे 
  • महापालिका फक्त दंड वसूल करतेय. सुविधा काहीच देत नाही. : प्रकाश रावळ 
  • महापालिका काम करतेय, हे पाहून बरे वाटते. सोबतच स्वच्छतागृह बांधा, स्वच्छता कामगारांना चांगल्या सुविधा द्या : जगन्नाथ साळुंखे