नगराध्यक्षांच्या कार्यभारावर संभ्रमावस्था

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

सातारा : कऱ्हाड, वाई, फलटण, म्हसवड व रहिमतपूर पालिकांच्या पूर्वाश्रमीचे नगराध्यक्ष, नगरसेवकांचा कार्यकाल संपला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक कार्यभार स्वीकारत असतात; परंतु राज्य सरकारने नगराध्यक्षांना जादा अधिकार देत उपाध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलला. मात्र, शुक्रवारनंतर कोणताच निर्णय जाहीर झाला नसल्याने पाच पालिकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

सातारा : कऱ्हाड, वाई, फलटण, म्हसवड व रहिमतपूर पालिकांच्या पूर्वाश्रमीचे नगराध्यक्ष, नगरसेवकांचा कार्यकाल संपला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक कार्यभार स्वीकारत असतात; परंतु राज्य सरकारने नगराध्यक्षांना जादा अधिकार देत उपाध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलला. मात्र, शुक्रवारनंतर कोणताच निर्णय जाहीर झाला नसल्याने पाच पालिकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील आठ पालिका उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 19 रोजी कऱ्हाड, वाई, फलटण, म्हसवड व रहिमतपूर पालिका, 22 रोजी सातारा, तर 31 रोजी पाचगणी, महाबळेश्‍वरच्या निवडी होणार होत्या. मात्र, नगराध्यक्षांच्या अधिकारात वाढ करत भाजप सरकारने पहिली सभा बोलविण्याचा अधिकार नगराध्यक्षांना दिला. त्यामुळे पहिला कार्यक्रम रद्द झाला आहे.

सध्या पाच पालिकांच्या गत नगराध्यक्षांचा कार्यकाल संपत आहे. त्यामुळे तेथे नवनिर्वाचित नगराध्यक्षांना कार्यभार स्वीकारावा लागणार आहे. यामध्ये कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, वाईच्या डॉ. प्रतिभा शिंदे, फलटणच्या सुनीता नेवसे, म्हसवडचे तुषार वीरकर, रहिमतपूरचे आनंदा कोरे यांचा समावेश आहे.
याबाबत नगरपालिका प्रशासन अधिकारी किरणराज यादव यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, "पुढील निर्णय होईपर्यंत नगराध्यक्षांनी कार्यभार स्वीकारण्याचा कार्यक्रम पुढे गेला आहे.' त्याला कऱ्हाडचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनीही पुष्टी दिली. दरम्यान, कऱ्हाडमध्ये शुक्रवारी नगराध्यक्ष पदभार स्वीकारतील, असे सांगण्यात आले. तर, वाई येथे उद्या नगराध्यक्षांकडून कार्यभार स्वीकारला जाणार असल्याचे सांगण्यात आले. राज्य शासनाच्या शुक्रवारचा आदेश प्रशासनालाच उमजेनासा झाला असल्याने प्रशासन, राजकीय वर्तुळात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून उद्या (ता. 19) कोणते परिपत्रक निघणार, याकडे लक्ष लागले आहे.

नगरपंचायतींत आज नगराध्यक्ष निवडी
कोरेगाव, पाटण, दहिवडी, वडूज व खंडाळा या पाच नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी सोमवारी (ता. 19) होणार आहेत. ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर पहिलीच निवडणूक झाली आहे. त्यामुळे या पाच नगरपंचायतींवर प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळणार, याची उत्सुकता ताणली आहे. मेढा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे. या प्रवर्गातील महिला सदस्य पंचायतीत नसल्याने नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम उद्या होणार नाही.

..........पूर्ण..............

Web Title: municipality presidents powers not clear