नामशेष होणार "ती' भित्तिचित्रे?

सुहास शिंदे
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

250 वर्षांपूर्वीची "ती' रेखाचित्रे म्हणजे पुरातन कलेचा एक अद्‌भूत नमुना आहे. पुरातत्त्व खात्याने ही चित्रे जतन करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अन्यथा ही चित्रे काळाच्या ओघात नामशेष होण्याची भिती निर्माण झाली आहे.

पुसेसावळी (जि. सातारा) : वडगाव जयराम स्वामी (ता.खटाव) येथील जयराम स्वामी समाधी मंदिरातील काशी विश्वेश्‍वराच्या मंदिरातील सुमारे 250 वर्षांपूर्वीची भित्तिचित्रे अद्यापही दुर्लक्षित असून, हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी पुरातत्त्व खात्याने लक्ष देण्याची गरज आहे.

मंदिराच्या छतावर असणारी ही चित्रे आणि त्यांचे रंगकाम अतिशय सुंदर असून, काळाच्या ओघात ही चित्रे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. 

संस्थानिकांच्या गावात... 
वडगाव जयराम स्वामी हे छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळातील संस्थानिक गाव आहे. सन 1750 च्या दरम्यान महादेव स्वामी गादीचे मठाधिपती झाले. त्यांच्याच काळात वडगावची खऱ्या अर्थाने स्थापना झाली. गावामध्ये त्यांनी अनेक जातीधर्माच्या लोकांना आश्रय दिला.

बाजारपेठ वसवून मठाच्या परंपरेत आपल्या आधी झालेल्या गुरूंच्या समाधी, विविध मंदिरे आणि राहण्यासाठी प्रशस्त असा बुरुज आणि तटबंदीचा मठ इत्यादी वास्तूंची बांधकामे केली. 

तग धरलेली रेखाचित्रे 
ही बांधकामे करतानाच महादेव स्वामींनी पुरातन भवानी शंकराच्या पाठीमागील बाजूस नेपाळवरून आणलेल्या अखंड शाळिग्राममध्ये घडवलेल्या विष्णू मूर्तीचीसाठी आणि काशीवरून आणलेल्या पिंडीची स्थापना घडीव दगडी मंदिरे बांधून केली. त्याच दरम्यान काशीविश्वेश्वराच्या मंदिराच्या छतावर गालिचा आणि बाजूला सुंदर अशी रेखाचित्रे त्यांनी काढून घेतली.

नरसिंह गणपती आणि विविध देवदेवतांची ही चित्रे आणि त्याची रंगरंगोटी मनमोहक आहेत. छतावरील गालिचाचा काही भाग गळून पडला आहे. अर्धा भाग सुस्थितीमध्ये असून बाजूला काढलेली रेखाचित्रे अजूनही तग धरून राहिली आहेत. ही रेखाचित्रे जतन करण्यासाठी पुरातत्त्व खात्याने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. 

चित्रे जतन करण्याची गरज 
जयराम स्वामी मठातील भिंतीवर असणारी चित्रे 40 वर्षांपूर्वी पुरातत्त्व खात्याने काढून सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात जतन केली आहेत. ती आजही जशीच्या तशी आहेत. त्याच पद्धतीने ही चित्रे जतन करण्याची गरज जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज आणि ग्रामस्थांनी व्यक्‍त केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: That Mural On Extinct Stage