PHOTO : लयभारी ! म्युरल्स कलेने कोल्हापुरी महिलेचा पुण्यात बोलबाला

नंदिनी नरेवाडी
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

प्रत्येक म्युरल हा माझ्यासाठी नवीन प्रयोग असतो. म्हणून प्रत्येक म्युरलचा आनंद खूप मोठा असतो. माझी कला अमर आहे. या म्युरल्सना ५० वर्षे काहीही होत नाही. आजही २५ वर्षं जुनी मी साकारलेली म्युरल्स दिमाखात भिंतीवर मिरवतात. 
- चिनार भिंगार्डे

कोल्हापूर : नावीन्य, कल्पकता आणि सौंदर्यपूर्णता यांचा त्रिवेणी संगम साधत कंदलगावच्या महिला शिल्पकार चिनार भिंगार्डे यांनी साकारलेल्या शेकडो भित्तीशिल्पांचा (म्युरल्स) सर्वत्र बोलबाला झाला आहे. सर्वसामान्यांच्या घरापासून ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वास्तूला त्यांच्या अद्‌भुत कलाकारीने सौंदर्याची जोड दिली आहे. अनेकजण आपल्या वास्तूच्या भिंती म्युरल्सनी नटविण्यात कमी पडत नाहीत. हौशींची गरज भागविण्यासाठी भिंगार्डे यांची म्युरल्स उपयुक्त ठरत असून, कलेतील सहजतेच्या छटा त्यांच्या शिल्पकलेला समृद्ध करणाऱ्या ठरल्या आहेत.

चिनार भिंगार्डे यांनी कलानिकेतन येथून जी. डी. आर्ट पूर्ण केले आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांना अशा प्रकारच्या कलाकृती करण्याचा छंद होता. दिवसा महाविद्यालयात व रात्री विविध शिल्पे बनविण्यात त्या व्यस्त असायच्या. त्यांनी बनविलेले हे म्युरल्स अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. त्यांचे हे कौशल्य कोल्हापुरातील नामांकित आर्किटेक्‍टस्‌नी हेरले. त्यांच्याकडे घरे, हॉटेल,  हाॅस्पिटलमधील भिंतीसाठी म्युरल्स बनविण्याच्या ऑर्डर येऊ लागल्या.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील म्युरल्सची शिल्पकार

कल्पकतेतून साकारलेली ही म्युरल्स पाहणाऱ्या प्रत्येकाच्या पसंतीस पडत. आतापर्यंत त्यांनी टेराकोटा, मेटल स्टील, तांबे, पितळ, लाकूड, दगड तसेच कोणत्याही टाकाऊ वस्तूपासून म्युरल्स बनविली आहेत. प्रत्येक वेळी वेगळ्या संकल्पनेतून साकारलेली त्यांची ही म्युरल्स प्रत्येक वास्तूच्या सौंदर्यात भर टाकत होती. त्यांच्या या कौशल्यामुळे पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात म्युरल्स साकारण्याचे काम त्यांना मिळाले. २०१८ मध्ये त्यांनी ११५० स्क्वेअर फूट जागेत मुख्य भिंतीवर म्युरल्स साकारले. अवघ्या दीड महिन्यात त्यांनी कलात्मक असे म्युरल्स साकारले. 

म्युरल्स म्हणजे काय ...?
कार्यालये, हॉटेल, हाॅस्पिटल, घर तसेच सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीवर म्युरल्स साकारली जातात. तेथील ठिकाणचे इंटिरिअर, रंगसंगती, वातावरणाचा विचार करून या म्युरल्सचे डिझाईन ठरवले जाते. सुरवातीला स्केचेस्‌मधून त्याची प्रतिकृती बनविली जाते. त्यानंतर म्युरल प्रत्यक्षात शिल्पाद्वारे साकारले जाते.

५० वर्षे टिकतात म्युरल्स

प्रत्येक म्युरल हा माझ्यासाठी नवीन प्रयोग असतो. म्हणून प्रत्येक म्युरलचा आनंद खूप मोठा असतो. माझी कला अमर आहे. या म्युरल्सना ५० वर्षे काहीही होत नाही. आजही २५ वर्षं जुनी मी साकारलेली म्युरल्स दिमाखात भिंतीवर मिरवतात. 
- चिनार भिंगार्डे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murals Art Made By Chinar Bhingarde Photo Story