कौटुंबिक वादातून जावयाने  केला सासूवर खुनी हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

- मोहोळमधील घटना

- सासूवर चाकूने हल्ला

- सासूवर सोलापुरात उपचार सुरू

 

मोहोळ : कौटुंबिक वादातून जावयाने सासूच्या पोटात चाकू खुपसून 
खुनी हल्ला केल्याची घटना सोमवारी साडेचार वाजता मोहोळ तालुक्‍यातील 
शिरापूर गावात घडली. सुवर्णा शिवाजी विटकर (वय 45, रा. शिरापूर, ता. मोहोळ) 
असे जखमी महिलेचे नाव आहे. तिच्यावर सोलापूरच्या 
शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. 
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की सुवर्णा शिवाजी विटकर यांची 
मुलगी शिरापूर येथे माहेरी आलेली आहे. त्यांचा जावई विशाल सुरेश वाघ (रा. पाटस, जि. पुणे) 
मुलीला सतत त्रास द्यायचा. त्यामुळे त्यांनी मुलीला सासरी पाठवलेले नव्हते. यामुळे जावई विशाल वाघ 
हा सासू सुवर्णा विटकर यांच्यावर चिडून होता. सोमवारी (ता. 11) जावई विशाल व सासू सुवर्णा यांच्यात 
शाब्दिक चकमक झाल्याने त्याने चिडून हातातील चाकूने त्यांच्यावर वार केले. त्याने त्यांच्या पोटात चाकू 
खूपसल्यामुळे सुवर्णा विटकर या गंभीर जखमी झाल्या. जखमी सुवर्णा विटकर यांचा 
आरडाओरडा ऐकून शेजारचे लोक मदतीला धावून आल्याचे पाहून जावई विशाल वाघ 
याने घटनास्थळावरून पळ काढला. या वेळी स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत 
त्यांना खासगी वाहनातून उपचारासाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. 
मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना 
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, 
सुवर्णा विटकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले आहे. 
या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder attack on monter in lows by son in low

टॅग्स
टॉपिकस