सासरच्यांच्या मारहाणीत जावयाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

सातारा - लिंब (ता. सातारा) येथे सासरची मंडळी व जावयांमध्ये काल (ता. 10) रात्री मारामारी झाली. सासरच्या लोकांनी दांडके, लाथाबुक्‍यांनी जोरदार मारहाण करून त्याला शिवारातील बाबळीच्या झाडाला बांधून ठेवले. या गंभीर मारहाणीत मृत्यू झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले. महादेव बाबू पवार (वय 28, रा. मतकर कॉलनी, सातारा) असे मृत व्यक्‍तीचे नाव आहे. याप्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरी शिवाजी राठोड (सासरा), सुनील हरी राठोड (मेव्हणा), शारदा हरी राठोड (सासू) व महादेव पवार (जावई) यांच्यात काल घरगुती कारणांवरून मारहाण झाली. महादेव यांची पत्नी ही दोन मुलांसह माहेरी राहात असल्याने तिला आणण्यासाठी ते लिंबला गेले होते. "आमच्याकडे राहण्यास ये', असे सांगून सासरच्यांकडून त्यांना सातत्याने दमदाटी केली गेली. या वेळी पवार यांनीही हरी राठोड यांना मारहाण केली. त्यामध्ये राठोड यांच्या कानाजवळ जखम झाली. त्यामुळे सासरे, सासू, मेव्हण्याने चिडून पवार यांना जोरदार मारहाण केली.

राठोड कुटुंब मजुरी करते. लिंब येथील बाळकृष्ण सावंत यांच्या विहीर खुदाईसाठी ते काम करत होते. मारहाणीनंतर या विहिरीशेजारील बाबळीच्या झाडाला पवार यांना रात्री सव्वाअकराच्या सुमारास बांधून ठेवले. आज पहाटेच्या सुमारास राठोड कुटुंबीय तेथे गेले असता पवार मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर ओरडाओरड झाल्याने ही घटना उघडकीस आली. मृताचे भाऊ शंकर पवार यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी सुनील राठोडला ताब्यात घेतले.

Web Title: murder by beating