मुलींचे अपहरण करून आईसह तिघांचा खून केल्याचा संशय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

जाधव कुटूंबातील तिघांच्या खून प्रकरणात तालुका पोलिस ठाण्याची पथके रवाना करण्यात आली आहे. ही घटना नेमकी कोणत्या कारणावरून झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रणसोड जाधव यांनी काही तरुणांवर संशय व्यक्त केला आहे. 
- अनिल देवडे,  सहायक पोलिस निरीक्षक

सोलापूर : तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धनाथ साखर कारखाना परिसरातील तिहेरी खून प्रकरणात कुटूंब प्रमुख रणसोड जाधव आणि नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर ते शांत झाले. खून करणाऱ्यांना अटक करा आणि माझ्या दोन्ही मुलींचा शोध घ्या अशी मागणी जाधव यांनी केली आहे. 

लोखंडी गजाने मारून जाधव याची पत्नी हयातबाई, मुलगी लाखी आणि मुलगा मफा या तिघांचा खून करण्यात आला आहे. जाधव हे मूळचे गुजरातचे असून साखर कारखाना परिसरात झोपडी करून राहतात. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ते सिद्धनाथ कारखानाच्या मागे झोपडी करून राहत होते. कुटूंबातील सदस्य गायी आणि म्हशी चारून दूध विक्रीचा व्यवसाय करतात. रणसोड हे बुधवारी (ता. 4) कामानिमित्त बऱ्हाणपूर (जि. नागपूर) येथे गेले होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात लोकांनी रणसोड यांची पत्नी, एक मुलगा आणि एका मुलीचा खून केला. झोपडीमध्ये खड्ड्यात पुरुन ठेवलेले पैसेही नेले. लग्नाच्या वयाच्या धूना आणि वसन या दोघी बहिणींचे अपहरण केले. शनिवारी दुपारपर्यंत त्या दोघींचा शोध लागलेला नव्हता. 

जाधव आणि त्यांच्या नातेवाईकांनी तालुका पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. खून करणाऱ्यांना अटक करा, माझ्या मुलींचा शोध घ्या अशी मागणी जाधव यांनी केली आहे. 

जाधव कुटूंबातील तिघांच्या खून प्रकरणात तालुका पोलिस ठाण्याची पथके रवाना करण्यात आली आहे. ही घटना नेमकी कोणत्या कारणावरून झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रणसोड जाधव यांनी काही तरुणांवर संशय व्यक्त केला आहे. 
- अनिल देवडे,  सहायक पोलिस निरीक्षक

Web Title: murder case in Solapur