किरकोळ वादातून गडहिंग्लज तालुक्यात मित्राचा खून

किरकोळ वादातून गडहिंग्लज तालुक्यात मित्राचा खून

गडहिंग्लज - हेब्बाळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे किरकोळ वादातून धारदार शस्त्राने भोसकून मित्राचा निर्घृन खून करण्यात आला. सतीश संजय बसर्गे (वय १९) असे खून झालेल्याचे नाव आहे. मंजूनाथ लक्ष्मण फुटाणे (वय २१, रा. हसूरचंपू, ता. गडहिंग्लज) असे संशयिताचे नाव असून, तो पसार आहे. आज रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

काही दिवसांपूर्वी हेब्बाळ येथे शर्यती होत्या. त्यावेळी भडगावचे काही तरुण व फुटाणे यांच्यात गाडी लावण्यावरून वादावादी झाली होती. त्यानंतर शनिवारी (ता. २) गडहिंग्लजमधील संकेश्‍वर रोडवरील एका पेट्रोल पंपावर फुटाणे, त्याचा एक मित्र व भडगावच्या काही तरुणांत वादावादी सुरू होती. गावाकडे जात असताना हा प्रसंग सतीश याने पाहिला आणि तोही तेथे गेला. भांडण मिटवण्याचा प्रयत्न सुरू असताना सतीश व फुटाणे या दोघा मित्रातच वादावादी सुरू झाली. तेव्हापासून या दोघांमध्ये वितुष्ट आले होते. दोघांनीही एकमेकांना दमदाटी केली होती. 

दरम्यान, आज सायंकाळी फुटाणे हा दूध घालण्यासाठी हेब्बाळमध्ये आला होता. त्यावेळी सतीशला याची कुणकुण लागली. तो फुटाणेजवळ गेला. तेव्हा दोघांत पुन्हा जुन्याच कारणावरून वादावादी सुरू झाली. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. मारामारी करतच हसूरचंपू रोडवरील एका गिरणीत तरुणांचा घोळका गेला. गिरणी मालकाने सर्वांना बाहेर हाकलून लाईट बंद केले. त्यामुळे अंधार झाला. त्याचवेळी फुटाणे याने सतीश याच्या पोटात धारदार शस्त्राने भोसकले. यानंतर लगेचच फुटाणे तेथून पळून गेला.

दरम्यान, ही घटना समजताच ग्रामस्थांनी सतीशला येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणले. परंतु, धारदार शस्त्राने घाव केल्याने पोटातच झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे सतीशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. रात्री उशिरा सतीशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेला. मृत सतीशचा चुलत चुलता रवींद्र रामाप्पा बसर्गे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. 

या घटनेची बातमी कळेल तसे हेब्बाळ आणि परिसरातील गावातून सतीशचे मित्र गोळा झाले होते. त्याचे नातेवाईकही मोठ्या संख्येने जमा झाले. मृत सतीशच्या गावातील मित्रांनी हॉस्पिटलसमोर रस्त्यावर लोळण घेत केलेल्या आक्रोशाने काळीज पिळवटून टाकले. 

मिलिटरी भरतीचे स्वप्न अधुरे
सतीशचे आई-वडील शेती करतात. सतीश गडहिंग्लजमधील एका महाविद्यालयात बीएस्सीच्या प्रथम वर्षात शिकतो. कॉलेज करतच भारतीय सैन्यदलात भरतीसाठीही त्याचे प्रयत्न सुरू होते. काही दिवसांपूर्वी तो लेखी परीक्षाही देऊन आला होता. दरम्यान, आज त्याचा खून झाल्याने सैन्यदलात जाण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिल्याची चर्चा उपस्थितांत होती. शांत स्वभावाच्या सतीशचा गावात मित्रपरिवारही मोठा आहे.

दोघेही जवळचे मित्र
संशयित फुटाणे व मृत सतीश हे दोघेही जवळचे मित्र. सर्वजण एकत्र येऊनच कबड्डीही खेळत असत. फुटाणे हा हसूरचंपूचा असला तरी तो नेहमी हेब्बाळमध्येच असतो. यामुळे दोघांची मैत्री वाढली होती. फुटाणे याचे हसूरचंपूपेक्षा हेब्बाळमध्येच अधिक मित्र आहेत. अगदी किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान खुनात झाल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार कबड्डी खेळताना झालेल्या किरकोळ वादावादीचे कारणही या खुनामागे असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com