पतीच्या डोक्‍यात पहार घालून सांगलीमध्ये खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

एक नजर

  • मद्यप्राशन करून शिवीगाळ करणाऱ्या पतीच्या डोक्‍यात पहार घालून पत्नीने केला खून. 
  • चंद्रकांत धोंडिराम साळुंखे (वय ४७) असे मृत पतीचे नाव. 
  • शामरावनगरमधील अरिहंत कॉलनीत रात्री आठच्या सुमारास घटना
  • संशयित पत्नी माधवी चंद्रकांत साळुंखे (३८) रात्री उशिरा  पोलिसांच्या ताब्यात. 

सांगली - मद्यप्राशन करून शिवीगाळ करणाऱ्या पतीच्या डोक्‍यात पहार घालून पत्नीने खून केला. चंद्रकांत धोंडिराम साळुंखे (वय ४७) असे मृत पतीचे नाव आहे. येथील शामरावनगरमधील अरिहंत कॉलनीत रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. संशयित पत्नी माधवी चंद्रकांत साळुंखे (३८) हिला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. शहरातील मध्यवस्तीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेली माहिती अशी, की मृत चंद्रकांत साळुंखे यांचा गणपती पेठेतील बालाजी चौकात चहाचा गाडा आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचा माधवीशी विवाह झाला. त्यांना मुलगाही आहे. चंद्रकांत यांना दारूचे व्यसन होते. यावरून पती-पत्नीत नेहमी वाद होत होते. आज दुपारीही चंद्रकांत यांनी मद्यप्राशन करून माधवीस शिवीगाळ केली. त्यावरून पुन्हा वादावादी झाली. वाद टोकाला गेल्यानंतर पत्नीने पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आला होता. 

दरम्यान, सायंकाळी सातच्या सुमारास पती-पत्नीत पुन्हा वादावादी झाली. नेहमीच्या वादाला पत्नी वैतागली होती. राग अनावर झाल्याने पत्नीने रागात पतीच्या डोक्‍यात पहार घातली. त्यात चंद्रकांत यांच्या डोक्‍यास गंभीर मार लागला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंद्रकांत यांना येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, ते मृत झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. खून झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. संशयित पत्नी माधवी हिला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, मृत चंद्रकांत यांचे राहते घर आईच्या नावावर होते. ते घर नावावर करून घेण्यासाठी माधवी वारंवार तगादा लावत होती. त्यातूनच मद्यप्राशन करून चंद्रकांत वादावादी करीत होते.

Web Title: murder of a husband in Sangli Shamraonagar