पूर्ववैमनस्यातूनच आचाऱ्याचा खून झाल्याचे स्पष्ट

पूर्ववैमनस्यातूनच आचाऱ्याचा खून झाल्याचे स्पष्ट

सांगली  - येथील जुना कुपवाड रस्त्यावरील मंगळवार बाजार चौकात भारती हॉस्पिटलमधील लेडीज होस्टेल मेसचा आचारी सुरेश सखाराम पाष्टे (वय ५०, संजयनगर) यांच्या खूनप्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने लावला. हल्लेखोर नितीन श्रीधर गाडे (वय ४२, संजयनगर) यास पोलिसांनी नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे अटक केली. पूर्वीचे भांडण, राग व पाष्टे आपल्या घरावर काळी करणी करीत असल्याचा संशय घेऊन खून केल्याची कबुली संशयिताने पोलिसांना दिली.  

पोलिसांनी माहिती दिली, की पाष्टे भारती हॉस्पिटलच्या मेसमध्ये आचारी होता. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास ते सायकलवरून घराकडे निघाले होते. दहाच्या सुमारास मंगळवार बाजार चौकात अंधार होता. संजयनगरच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोर गाडेने चौकात त्यांना अडवले. चाकू काढून पाष्टेंच्या मानेवर वार केला. हल्लेखोराने त्यांना खाली पाडून गळा चिरण्याचाही प्रयत्न केला. तब्बल २८ वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, हल्ल्याच्या वेळी वाहतूक पोलिस तेथून जात होते. त्यांना अंधारात या घटनेचा संशय आला. तेव्हा हल्लेखोर दुचाकी घेऊन सह्याद्रीनगर पुलाकडे पळाला. पोलिसांनी त्या दरम्यान रस्त्यावरील सीसीटीव्हीचा आधार घेत, होस्टेलमधील कर्मचाऱ्यांशी चौकशी करून हल्लेखोराचे नाव निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला.

पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे, एलसीबीचे निरिक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, दिलीप ढेरे, सहाय्यक फौजदार राजू कदम, विजय पुजारी, अमित परीट, बिरोबा नरळे यांच्या पथकाने मृत राहत असलेल्या ठिकाणावरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक तपासात संशयित नितीन गाडेने खुनाची कबुली दिली आहे. घटना घडल्यापासून नितीन गायब होता. तो नृसिंहवाडी परिसरात आढळला. त्याने दुचाकीच्या क्रमांकावर खाडाखोड केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दहा वर्षांपूर्वीचे भांडण...
सुरेश पाष्टेंच्या घरासमोर राहत असलेल्या नितीनशी दहा वर्षांपूर्वी भांडण झाले होते. तेव्हापासून दोन्ही कुटुंबांत बोलणे बंद होते. गाडेच्या घरातील व्यक्ती सतत आजारी असत. पाष्टे कुटुंब मूळचे कोकणातील असल्याने ते काळी जादू, भानामती आणि करणी करीत असावेत, असा नितीनला संशय होता. त्यावरूनच त्याने घरातील एक लहान चाकू, बाजारातून दुसरा मोठा चाकू आणून पाष्टे यांचा खून केल्याची कबुली दिली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com