सांगलीत होस्टेलवरील आचाऱ्याचा निर्घृण खून

सांगलीत होस्टेलवरील आचाऱ्याचा निर्घृण खून

सांगली - येथील जुना कुपवाड रस्त्यावरील मंगळवार बाजार चौकात भारती हॉस्पिटलमधील लेडीज होस्टेल मेसचा आचारी सुरेश सखाराम पाष्टे (वय ५०, रा. समर्थ शाळेजवळ, संजयनगर) यांचा निर्घृण खून करण्यात आला. रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. प्राथमिक तपासात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने सायकलवरील पाष्टे यांना अडविले. त्याने त्यांच्यावर धारदार चाकूने मानेवर, पाठीवर वार केले. दरम्यान, खुनाचे नेमके कारण उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. 

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी - पाष्टे सकाळी सायकलवरून मेसमध्ये जातात. ते रात्री दहापर्यंत घरी येत होते. आज रात्री नऊच्या सुमारास ते सायकलवरून घराकडे निघाले होते. दहाच्या सुमारास मंगळवार बाजार चौकात अंधार होता. तेव्हा संजयनगरच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने चौकात त्यांना अडवले. 

चाकू काढून पाष्टे यांच्या मानेवर वार केला. पाष्टे यांनी झटापट केली; परंतु त्यांचा प्रतिकार तोकडा पडला. हल्लेखोराने त्यांना खाली पाडून गळा चिरण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एका चाकूची मूठ आणि पाते तुटून पडले. पाष्टे यांच्या गळ्यावर आणि पाठीवर वार झाल्यामुळे ते खाली कोसळले.

हल्ल्यावेळी वाहतूक पोलिस तेथून जात होते. त्यांनी अंधारात हा प्रकार बघितला. तेव्हा हल्लेखोर दुचाकी घेऊन सह्याद्रीनगर पुलाकडे पळाला. पोलिसांसह काहीजणांनी पाठलाग करून दुचाकीचा नंबर टिपला; परंतु हल्लेखोर सापडला नाही. 

इकडे गळ्यावर खोलवर वार झालेले पाष्टे रक्ताच्या थारोळ्यात पालथे कोसळले. बाजूलाच त्यांची सायकल, मोबाईल, घड्याळ, चप्पल पडली होती. चाकूची मूठ व पातेही बाजूलाच पडले होते. खुनाची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय सुर्वे व पोलिस घटनास्थळी धावले. मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गिल, गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक संतोष डोके यांचे पथक घटनास्थळी आले. तोपर्यंत बघ्यांची गर्दी झाली होती. पाष्टे यांचा मुलगा वडिलांचा शोध घेत घटनास्थळी आला; त्या वेळी पाष्टेंची ओळख पटली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवला.

पाळत ठेवून हल्ला
मृत पाष्टे कोणत्या मार्गावरून घराकडे जातात, याची माहिती हल्लेखोराने घेतली होती. मंगळवार बाजार चौकात अंधारात कोणी नसल्याचे पाहून थेट हल्ला चढविला. पाष्टे यांना प्रतिकार करण्याची संधी न देता हल्ला करून पळण्यात यशस्वी झाला. पाष्टे यांची पूर्वी राजवाडा चौकात पानटपरी होती. सध्या ते आचारी होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com