किरकोळ कारणावरून जतमध्ये तरुणाचा खून

किरकोळ कारणावरून जतमध्ये तरुणाचा खून

जत - किरकोळ कारणावरून शहरातील अविनाश शिवाजी साळुंखे (वय २७, रा. विठ्ठलनगर) याचा खून करण्यात आला. हा प्रकार सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून पृथ्वीराज शंकर निकम, विकास ऊर्फ सोनू बाळासाहेब भोसले व आकाश ऊर्फ मोनू बाळासाहेब भोसले या तिघांना अटक केली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - अविनाश कुटुंबासह विठ्ठलनगरमध्ये रहात होता. तो सेंट्रिंगचे काम करत  होता. तो, सोमवारी रात्री नऊ वाजता कामावरून आल्यानंतर आवरून बाहेर गेला. विकास भोसले यांच्या  घरासमोरून जात असताना पृथ्वीराज निकम याने एवढ्या रात्री कुठं फिरतोस, असे विचारले. त्यावर अविनाशने तुला काय करायचे, असे प्रत्युत्तर दिले. त्यातून दोघांत वाद झाला. याचवेळी पृथ्वीराजचा मित्र विकास आणि आकाश माने तेथे आले. त्यातून पुन्हा वाद वाढत गेला. संतापाच्या भरात त्याने अविनाशच्या डोक्‍यात काठीचे घाव घातले. डोके फुटल्याने अविनाश घरी गेला. घरातच प्राथमिक उपचार करून झोपी गेला.

पत्नी कविताने मंगळवारी सकाळी अविनाशला  उठवण्याचा प्रयत्न केला; पण त्याची हालचाल होत नव्हती. त्यामुळे पत्नी, आई, दीर संजय व चुलत दीर नेताजी यांनी त्याला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी पुढील उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथे उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. याबाबत पत्नी कविता यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

टोळक्‍यांची चर्चा
शहरातील विठ्ठलनगर अलीकडे गुन्हेगारीचा परिसर म्हणून नावारूपास येत आहे. तरुणांची टोळकी जागोजागी थांबून असतात. अनेकदा त्यांच्यात वाद, भांडण, मारामारी असे प्रकार होत होते. त्याची मजल आता खुनापर्यंत गेली आहे.

पंधरा दिवसाला एक खून 
गेल्या दोन महिन्यात जत परिसरात चार खून झाले. सहा महिन्यात सात खून झाले. ही धक्कादायक आकडेवारी पाहता, वाढती गुन्हेगारी समोर येत आहे. 

चेष्टा अंगलट आली
मृत अविनाश, संशयित पृथ्वीराज, विकास, आकाश मित्र होते. चौघेही दररोज दारू प्यायचे. काहीवेळा पार्टीही करायचे. सोमवारी रात्रीही दारूच्या नशेत एकमेकांची  चेष्टा करीत होते. चेष्टेत वाद झाला. त्यानंतर मारामारी झाली. त्यात अविनाशचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com