माजी आमदारांच्या मेहुण्याचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

  • घरात घुसून हल्ला
  • पत्नीसह अन्य एक जखमी
  • हल्लेखोर भावशा हवेत गोळीबार करून फरार

इस्लामपूर : रेठरे धरण (ता. वाळवा) येथील "मोस्ट वॉंटेड' गुंड भाऊसाहेब ऊर्फ भावशा वसंत पाटील याने माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे मेहुणे संताजी दादासाहेब खंडागळे (वय 45, रा. रेठरे धरण) यांचा सत्तुराने वार करून निर्घृण खून केला. पतीला वाचवण्यास धावलेल्या राजश्री खंडागळे (35) आणि शेजारी विश्वास शामराव जाधव (40) यांच्यावरही त्याने वार केले. दोघेही गंभीर जखमी आहेत. त्यांना इस्लामपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेने रेठरे धरण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. वाळवा व शिराळा तालुक्‍यांत खळबळ माजली.

अधिक माहिती अशी : आज सायंकाळी संताजी खंडागळे आपल्या मित्रांसमवेत जांभूळवाडी येथे गेले होते. तेथून आल्यानंतर ते घरी टीव्ही पाहात बसले होते. पत्नी स्वयंपाक करत होत्या. दरम्यान, साडेसातच्या सुमारास भावशा दोन साथीदारांसह घरात घुसला. बाहेर असलेल्या साथीदाराने 'वाघ आला, वाघ आला' असा आरडाओरडा केला. तेवढ्यात आतमध्ये भावशा आणि साथीदाराने रापी व सत्तूर यांसारख्या धारदार शस्त्राने संताजी यांच्यावर वार केले. दंगा सुरू असल्याचे पाहून पत्नी राजश्री बाहेर आल्या. पतीला मारहाण सुरू असल्याचे पाहून त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला; तेव्हा त्याने त्यांच्या मानेवर, हातावर गंभीर वार केले. त्यांच्या डाव्या बाजूच्या कानाची पाळी तुटली आहे. भांडण आणि आरडाओरड ऐकून शेजारील विश्वास जाधव घरात धावत आले; तेव्हा त्यांच्याही मानेवर वार करून तिघे हल्लेखोर घरातून बाहेर पडले.

गोंधळ ऐकून शेजारील नागरिक खंडागळे यांच्या घराकडे धावले; परंतु अंगणात आल्यावर हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून "भावशा, भावशा' असा आरडाओरडा केला. त्यामुळे नागरिक माघारी फिरले. ती संधी साधून भावशाने साथीदारांसह पलायन केले. तिघे पळाल्यानंतर नागरिकांनी जखमी संताजी, पत्नी राजश्री व विश्वास जाधव यांना उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात हलवले; मात्र उपचारापूर्वीच संताजी यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

या घटनेनंतर प्रकाश हॉस्पिटलच्या आवारात माजी आमदार मानसिंगराव नाईक, शिराळा पंचायत समितीचे सभापती सम्राटसिंह नाईक यांच्यासह वाळवा, शिराळा तालुक्‍यांतील राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांसह रेठरे धरण ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.

Web Title: murder of mla's brother