मतिमंद बहिणीचा खून करून मनोरुग्ण महिलेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

वाई - मतिमंद असलेल्या मोठ्या अविवाहित बहिणीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केल्यानंतर मनोरुग्ण विवाहित महिलेने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. या वेळी वडिलांवरही तिने चाकूने हल्ला केल्याने ते जखमी झाले. एकसर (ता. वाई) येथे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  

वाई - मतिमंद असलेल्या मोठ्या अविवाहित बहिणीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केल्यानंतर मनोरुग्ण विवाहित महिलेने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. या वेळी वडिलांवरही तिने चाकूने हल्ला केल्याने ते जखमी झाले. एकसर (ता. वाई) येथे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  

हेमा अरविंद कळंबे (वय २८) व सीमा विशाल गायकवाड (वय २७) अशी मृत बहिणींची नावे आहेत. वडील अरविंद पांडुरंग कळंबे (वय ६०) हे जखमी झाले. एकसर येथील बस थांब्याजवळ टाकेमाळ नावाच्या शेतात अरविंद कळंबे व पत्नी सुनीता (वय ४५) राहतात. त्यांना हेमा, सीमा व रिमा अशा तीन मुली आहेत. त्यातील हेमा ही मतिमंद असून, अविवाहीत होती. सीमा व रिमा या दोघींचा विवाह झाला आहे. सीमा पाचगणीत, तर रिमा सागर शिंदे (वय २५) या पुण्यात असतात. दोन वर्षांपासून मानसिक संतुलन बिघडल्याने सीमा या उपचारासाठी वडिलांबरोबर एकसर येथे राहात होत्या.

त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून औषधोपचारही सुरू होते. आज सकाळी सीमा व हेमा दोघीही एकत्र कपडे धुण्यासाठी कालव्यावर गेल्या होत्या.

त्यानंतर दोघींनी घरी येऊन स्वयंपाक केला. दरम्यान, वडील अरविंद कळंबे हे घरालगतच्या शेतात कांदे काढण्यासाठी गेले होते. साडेदहाच्या सुमारास अचानक आरडाओरड ऐकू आल्याने त्यांनी घराकडे धाव घेतली. घरात येऊन पाहिले असता हेमा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले.

सीमाच्या हातात चाकू होता. तिने वडिलांवरही हल्ला करून त्यांच्या उजव्या दंडावर व पोटरीवर वार केले. प्रसंगावधान राखून वडील घराबाहेर आले आणि त्यांनी घराचा दरवाजा बंद करून गावाकडे धाव घेतली. गावातील लोकांसोबत पुन्हा घरी आल्यावर त्यांना सीमानेही स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुतण्या विशाल कळंबे याने अरविंद यांना उपचारासाठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना घटनेची माहिती दिली. आई सुनीता या पुण्याला रिमाच्या घरी गेल्या होत्या. त्यामुळे घरी दोघी बहिणी व वडील असे तिघेच होते. प्राथमिक उपचारानंतर अरविंद कळंबे यांनी याबाबतची फिर्याद पोलिसांत दिली.

पोलिस निरीक्षक विनायक वेताळ तपास करीत आहेत. रात्री उशिरा एकसर स्मशानभूमीत दोघी बहिणींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: murder & suicide