किल्लेमच्छिंद्रगड परिसरात मुरूम, माती चोरीकडे दुर्लक्ष 

शिवकुमार पाटील
Tuesday, 15 December 2020

उत्तर वाळवा तालूक्‍यातील किल्लेमच्छिंद्रगड, येडेमच्छिंद्र, नरसिंहपूर, भवानीनगर, लवंडमाची, रेठरे हरणाक्ष येथे मोठ्या प्रमाणात पडीक गायरान क्षेत्र आहे. या क्षेत्राचे स्वरुप डोंगर, माळरान असे आहे.

किल्लेमच्छिंद्रगड : उत्तर वाळवा तालूक्‍यातील किल्लेमच्छिंद्रगड, येडेमच्छिंद्र, नरसिंहपूर, भवानीनगर, लवंडमाची, रेठरे हरणाक्ष येथे मोठ्या प्रमाणात पडीक गायरान क्षेत्र आहे. या क्षेत्राचे स्वरुप डोंगर, माळरान असे आहे. गौण खनिज संपत्तीची विपुलता असल्याने सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून खनिज माफियांची आजअखेर वक्रदृष्टी राहिली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे, राजकिय वरदहस्ताने काही वर्षात लाखोंच्या मुरुम, मातीची चोरी झाली आहे. 

गौण खनिज माफियांबद्दल तक्रारी झाल्या तरी कागदी घोडे शासकीय लाल फितीत कुठे गायब झाले हे सांगणे अवघड आहे. गौण खनिज संपत्तीची होणारी चोरी टाळण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड, जलसंधारणाची कामे हाती घेल्यास पडीक गायरान क्षेत्राचा पर्यावरणपुरक कामासाठी उपयोग होईल. ग्रामपंचायतींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तहसिल, वनविभागासह पंचायत समितीने विशिष्ट कालावधीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करुन ग्रामपंचायतींना बळ दिल्यास पडीक गायरान सुरक्षित राहणार आहेत. 

किल्लेमच्छिंद्रगडला सुमारे अडीचशे एकर गायरान आहे. गट नंबर 744 मधून मुरुम, मातीची मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे. तक्रारी होऊनही मनगटशाहीच्या जोरावर वहिवाट घालणाऱ्या प्रवृतींना अभय दिले गेल्याचे दिसते. गट नंबर मध्ये 138 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहे. अद्यापही सुरुच आहेत. गट नंबर 750 हा पर्यटन स्थळाचा डोंगर आहे. डोंगर पायथा तोडून अतिक्रमणे सुरु आहेत. गट नंबर 254 मध्ये अतिक्रमण करुन जमीन हडपण्यासाठी कच्च्या इमारती बांधून वहिवाटी घातल्या आहे. या क्षेत्राची मोजणी होऊन अतिक्रमणे झाल्याचे सिद्ध झाले आहे. राजकीय दबावापोटी अतिक्रमणे काढण्यास प्रशासन, कार्यकर्ते कच खात आहेत. वन विभागाच्या अखत्यारीतील गट नंबर 749 मधील वनक्षेत्रातील वृक्षतोड करणारांवरही कारवाई करण्यात वनविभाग कुचराई करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

झाडांची चोरी, लागवड नाहीच :
किल्लेमच्छिंद्रगडच्या काही क्षेत्रासह ताकारी, दुधारी, बेरडमाची, लवंडमाची, रेठरे हरणाक्ष येथील डोंगराळ भागाच्या गायरान क्षेत्राची मालकी वनविभागाकडे आहे. वनक्षेत्रातील चंदन चोराकडे कोणतीच कारवाई होताना तसेच वनक्षेत्रात नव्याने वृक्षलागवड करण्याचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. ग्रामपंचायतींच्या अखत्यारीतील क्षेत्राची देखभाल करताना ग्रामपंचायतींची उदासिनता आहे. महसूल विभागाच्या मदतीने अतिक्रमणे काढण्याची कारवाई करणे, वृक्षतोड करणाऱ्यावर तसेच गौण खनिज संपत्तीची चोरी करणावर कारवाई होणे गरजेचे आहे. तहसिलदार, गटविकास अधिकारी, वनक्षेत्रपालांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. 

गायरान क्षेत्रे सुरक्षित रहावीत यासाठी गायरान क्षेत्रात वृक्षलागवड, जलसंधारणाची कामे हाती घेण्याबाबत तसेच अतिक्रमणे काढण्याबाबत सक्तीची कारवाई करण्याची सूचना संबंधित ग्रामपंचायतींना करण्यात येईल. 
- शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी वाळवा पंचायत समिती, इस्लामपूर 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murum in Fort Machhindragad area, neglect of soil theft