मुश्रीफ-महाडिक अबोला कायम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

कोल्हापूर - राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्यातील अबोला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याही दौऱ्यात कायम राहिला. जिल्हा परिषद निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या भूमिकेवरून या दोघांत निर्माण झालेल्या मतभेदाचे पडसाद श्री. पवार यांच्या दौऱ्यातही पाहायला मिळाले. 

जिल्ह्याच्या राजकारणात श्री. मुश्रीफ यांना एकटे पाडले जात होते; पण श्री. महाडिक यांनी त्यांना साथ देत पक्षाच्या कामकाजाला सुरवात केली होती; मात्र दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपसोबत जाण्याची घोषणा श्री. महाडिक यांनी केली. विशेष म्हणजे ही घोषणा त्यांनी श्री. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत केली. दुसऱ्या दिवशी श्री. मुश्रीफ यांनी याला विरोध करत या मतदारसंघात राष्ट्रवादीची आघाडी काँग्रेससोबतच होईल, असे जाहीर केले. त्यानंतर थोडे नमते घेत श्री. महाडिक यांनीही हा निर्णय मान्य केला; पण दक्षिणमध्ये अलिप्त राहण्याची घोषणा केली. तेव्हापासून पुन्हा या दोघांत मतभेद निर्माण झाले. 

काल (ता. २७) पक्षाध्यक्ष श्री. पवार यांचे कोल्हापुरात आगमन झाले; पण त्यांच्या स्वागता वेळी या दोघांची तोंडे एकमेकांच्या विरोधात होती. श्री. महाडिक यांनी आयोजित केलेल्या भिमा कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमातही श्री. मुश्रीफ यांनी आपले खासदार महाडिक यांच्याशी राजकीय मतभेद असल्याची कबुली दिली. आज सकाळपासून श्री. मुश्रीफ व श्री. महाडिक एकत्र होते; पण त्यांच्यात अपवादानेच चर्चा झाली. खुर्चीला खुर्ची लागून असूनही त्यांच्यात संभाषण झाले नाही. श्री. महाडिक यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनाला श्री. मुश्रीफ उपस्थित राहिले; पण दोघांतील अबोला कायम राहिला.

Web Title: mushrif & mahadik dispute