टाकाऊतून टिकाऊ निर्माण करणारा  सोलापुरातील संगीतप्रेमी "अवलिया' 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

गाणे वाजविण्याच्या यंत्रातील बदल
गाणे तेच, मात्र ते वाजविण्याच्या यंत्रांमध्ये गरजेनुसार बदल झाला. मात्र ग्रामोफोनवर गाणे ऐकण्याचा जो आनंद आहे, तो डीव्हीडीवर निश्‍चितच मिळत नाही. 
- नागनाथ सलगर, 
ग्रामोफोन संग्राहक व तंत्रज्ञ, सोलापूर 

सोलापूर : चोखंदळ नजर आणि नवीन कल्पनांची सांगड असेल तर मातीतूनही सोनं काढता येतं असे म्हटले जाते. त्याचाच प्रत्यय सोलापुरातील अवलिया कलाकार नागनाथ सलगर यांनी तयार केलेला ग्रामोफोन पाहिल्यावर येतो. 

सुमारे 150 वर्षांचा इतिहास असलेल्या सोलापुरातील मंगळवार बाजारात "मेड इन जर्मन'चा बंद पडलेला ग्रामोफोन नागनाथ यांना मिळाला. त्याची अवस्था पाहिली तर तो टाकून देण्याशिवाय पर्यायच नाही असे वाटावे. "शरपंजरी'वर असलेला ग्रामोफोन दुसरे कुणी असते तर "शो पीस' म्हणून ठेवला असता. पण नागनाथ यांनी जिद्द सोडली नाही. जिद्द सोडली ते नागनाथ कसले. त्यांनी ग्रामोफोनला नवे रूप देण्याचा संकल्प केला. त्यांच्याकडे उपलब्ध असलेले आणि गरज भासेल तसे जुना बाजार आणि दुकानातून साहित्य आणले. तयार झाला जुन्या काळात प्रतिष्ठेचा मानबिंदू असलेला ग्रामोफोन. हा ग्रामोफोन तयार व्हायला आठ ते दहा दिवस लागले, मात्र प्रत्यक्षात सुरू व्हायला दोन वर्षे लागली. त्याचे झाले असे, आवाजाचे बटन लावण्यासाठी ठराविक आकाराची स्टीलची प्लेट लागणार होती. ती प्लेट काही केल्या मिळेना. त्यांनी अनेक ठिकाणी शोधले, जुना बाजार वारंवार धुंडाळला. मात्र प्लेट काही मिळाली नाही. अखेर त्यांची शोधमोहीम नवी पेठेत थांबली. एका दुकानात गेले असता त्यांना योग्य आकाराची प्लेट सापडली आणि त्यांना अत्यानंद झाला. कारण दोन वर्षांपासून तयार असलेल्या ग्रामोफोनचा आनंद त्यांना घेता येणार होता. सलगर यांनी काही मिनिटांमध्ये प्लेट लावली आणि सुरू झाले "जब दिल ही टूट गया... हम जीके क्‍या करंगे......! 

हे ही वाचा.....पीठ मे का दर्द, चोल्या तो मोकला होता है 

केवळ ग्रामोफोनच नव्हे तर ग्रामोफोन ते आजच्या जमान्यातील मेमरी कार्डपर्यंतचे साहित्य त्यांच्याजवळ उपलब्ध आहे. चावीवाला ग्रामोफोन.... एकेकाळच्या ऐश्‍वर्याचे प्रतीक. ग्रामोफोन ज्याच्या घरी ती व्यक्ती धनाढ्य असे समीकरण. काळ बदलत गेला आणि ग्रामोफोनच्या स्वरूपातही बदल होत गेला. इलेक्‍ट्रॉनिक ग्रामोफोन, स्पूल टेप, टेप रेकॉर्डर, कॅसेट, सीडी, डीव्हीडी, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, आयपॉडपासून हा प्रवास आता मेमरी कार्डपर्यंत पोचला आहे. 

असा आहे ग्रामोफोन टू मेमरीचा प्रवास.... 
- चावी दिल्यावर चालणारे ग्रामोफोन 
- विजेवर चालणारे ग्रामोफोन (चेंजर) 
- स्पूल टेप 
- टेपरेकॉर्डर 
- सीडी-डीव्हीडी 
- आयपॉड 
- मेमरी कार्ड 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a music lover from Solapur who produces sustainable from waste