"तांबडा-पांढरा' तापला शीक कढई "नरमली

प्रमोद बोडके
रविवार, 15 डिसेंबर 2019

विषय टोल नाक्‍याचा असो की मटनाच्या दराचा. प्रत्येक अन्यायकारक विषयात आवाज उठवून कोल्हापूरने आपले वेगळेपण जपले आहे. लढ्याचा आणि संघर्षाचा इतिहास असलेले सोलापूर मात्र अलीकडच्या काळात शांत झालेले दिसत आहे.

सोलापूर : वशाड खाणाऱ्यांसाठी शुक्रवार, रविवार, मंगळवार, बुधवार हे आवडीचे दिवस. मंगळवार आणि शुक्रवार असला की मटनाची तलफ होतेच. तांबड्या पांढऱ्या रश्‍श्‍यासाठी फेमस असलेल्या कोल्हापुरातील खवय्यांनी मटनाच्या दराविरोधात बंड केले. जगात सोलापूरची ओळख सांगणाऱ्या शिक कढईचे खवय्ये मात्र गपगुमान 530 रुपये किलो दराने मटन खात आहेत. कोल्हापुरातील वाढत्या मटनाच्या दराने रस्साही तापला, सोलापुरातील शिक कढईचे खवय्ये मात्र नरमले आहेत. 
विषय टोल नाक्‍याचा असो की मटनाच्या दराचा. प्रत्येक अन्यायकारक विषयात आवाज उठवून कोल्हापूरने आपले वेगळेपण जपले आहे. लढ्याचा आणि संघर्षाचा इतिहास असलेले सोलापूर मात्र अलीकडच्या काळात शांत झालेले दिसत आहे. कोल्हापुरातील मटनाचे दर निश्‍चित करण्यासाठी तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन या दरावर तोडगा काढला. सोलापुरात 500 रुपयांपासून ते 560 रुपयांपर्यंत सध्या मटन मिळते. मटनाच्या वाढत्या दरावर नियंत्रण करण्यासाठी कसलीही यंत्रणा नसल्याने खवय्यांना मिळेल त्या भावात मटन खावे लागते किंवा मटनाची भूक ब्रॉयलर कोंबडीच्या चिकनवर भागवावी लागत आहे. 

हेही वाचा : आर. आर. आबाच्या लेकीला पुत्ररत्न! 
कर्नाटकाच्या व्यापाऱ्यांनी वाढविले भाव 

सांगोला, करजगी यासह सोलापूर जिल्ह्यातील जनावरांच्या मोठ्या बाजारात कर्नाटकच्या विशेषतः बंगळुरुच्या व्यापाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. कर्नाटकात 600 रुपये किलोने मटनाची विक्री होत असल्याने सोलापूरच्या बाजारातून चढ्या दराने ते बकऱ्याची खरेदी करतात. त्या स्पर्धेत आपल्यातील मटन व्यापारी बकऱ्यांची खरेदी करत असल्याने त्यांना नेहमीच्या तुलनेत महाग बकरे मिळू लागले आहेत. या सर्वांचा परिणाम मटन खरेदीच्या दरावर झाल्याचे मटन विक्रेत्यांनी सांगितले. 

हेही वाचा : ठरलं.. कर्जमाफीची कट ऑफ डेट 31 ऑगस्ट! 
आमदनी अठण्णी, खर्चा रुपय्या
 
वाढते घरभाडे, दैनंदिन जीवनातील वाढता खर्च आणि उत्पन्नाचे मर्यादित झालेले मार्ग या सर्वांचा परिणाम म्हणजे सर्वसामान्यांना त्यांच्या गरजा भागविण्यासाठी आर्थिक ओढाताण करावी लागत आहे. हौसेला मोल नसल्याने ज्या ठिकाणी एक किलो मटनात संपूर्ण घरदार दिवसभर जेवत होते तेच कुटुंब आता अर्धा किलो मटनात एक वेळ जेवत आहे. 
 
ग्राहक त्रस्त 
मटनाचे दर वाढले तरीही आम्ही आमचे दर कायम ठेवले आहेत. शीक कढई घेण्यासाठी ग्राहक स्वतः मटन घेऊन येतात. त्यामुळे भाजनालय वाल्यांना वाढीव मटन दराचा फारसा परिणाम होत नाही. 
- बबलू सय्यद, शीक कढई, विक्रेते 

महागाईच्या झळा 
सध्या सर्वच ठिकाणी महागाईच्या झळा बसू लागल्या आहेत. 480 ते 500 रुपये किलोपर्यंत मटनाचे दर योग्य आहेत. मटनाचे दर वाढले तर सर्वच बजेट कोलमडते. मटनाचे दर आवाक्‍यात असायला हवेत. 
- राज भगवानदास, ग्राहक 

बोकडांचा पुरवठा कमी 
बाजारांमध्ये चांगल्या बोकडाच्या किमती वाढल्या आहेत. बाजारात बोकडांचा पुरवठा कमी झाल्याने व बाहेरचे व्यापारी येऊ लागल्याने मटनाचे दर वाढले आहेत. कमीत कमी नफा मिळवून असलेले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आम्ही मटन देण्याचा प्रयत्न करतो. 
- जावेद कुरेशी, मटन विक्रेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mutton at Rs 530 per kilogram in Solapur