फडवणीस आडनावामुळे माझे खूप नुकसान : डॉ. मृणालिनी फडणवीस

तात्या लांडगे
रविवार, 6 मे 2018

मुंबई आणि सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर दोन्ही नावे एकाचवेळी जाहीर होतील, असे वाटत असताना केवळ मुंबई विद्यापीठाच्याच कुलगुरुंचे नाव जाहीर झाले.

सोलापूर : कुलगुरुपदी माझी निवड गुणवत्तेवर झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे माझे जवळचे नातेवाईक नसून ते केवळ आडनाव बंधू आहेत. त्यांच्या नावाचा व आडनावाचा मला फायदा तर झालाच नाही. मात्र, बऱ्याच ठिकाणी मला नुकसान सहन करावे लागले, असे स्पष्टीकरण सोलापूर विद्यापीठाच्या नूतन कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिले. 

मुंबई आणि सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर दोन्ही नावे एकाचवेळी जाहीर होतील, असे वाटत असताना केवळ मुंबई विद्यापीठाच्याच कुलगुरुंचे नाव जाहीर झाले. त्यावेळी नागपूरच्या डॉ. मृणालिनी फडवणीस या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु होणार हे निश्‍चित, अशी चर्चा होती. त्यानुसार डॉ. फडवणीस यांचेच नाव जाहीर झाले. याबाबत डॉ. फडवणीस यांना विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले. 

सोलापूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. एन. एन. मालदार यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2017 रोजी संपल्यानंतर प्रभारी कुलगुरू म्हणून पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. त्यांच्याकडून रविवारी, डॉ. फडवणीस यांनी पदभार घेतला.

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी पुण्याचे डॉ. प्रदीप कुंडल, डॉ. आनंद भालेराव, डॉ. किशोर रावंडे आणि डॉ. उद्‌य भोसले व डॉ. मृणालिनी फडणवीस या पाच उमेदवारांच्या मुलाखती राज्यपाल तथा कुलपती के. विद्यासागर राव यांनी घेतल्या होत्या.

Web Title: My biggest loss due to fadnavis says Dr Mrinalini Fadnavis