esakal | माय नेम इज बॉंड..जेम्स बॉंड...!! 
sakal

बोलून बातमी शोधा

माय नेम इज बॉंड..जेम्स बॉंड...!! 

टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेशन.. 
जावे नव्या इश्‍काच्या वाटा धुंडाळत लोटस अर्थात कमळपुष्पांच्या मखमाली नॅशनल हायवेवरून?...की मग पडावे तसेच होलपडत आणि सोसावा अन्याय याच घड्याळाच्या काट्यांमध्ये अडखळून..!! 

माय नेम इज बॉंड..जेम्स बॉंड...!! 

sakal_logo
By
घाटी पठ्ठ्या

माय नेम इज बॉंड..जेम्स बॉंड...!! 
मीच आहे ऑथेल्लो, सुधाकर आणि हॅम्लेट..मीच आहे राजकारणातला जेम्स बॉंड-द नटसम्राट...!! 
... 
टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेशन.. 
जावे नव्या इश्‍काच्या वाटा धुंडाळत लोटस अर्थात कमळपुष्पांच्या मखमाली नॅशनल हायवेवरून?...की मग पडावे तसेच होलपडत आणि सोसावा अन्याय याच घड्याळाच्या काट्यांमध्ये अडखळून..!! 
... 
करावा हा एकदाचा शेवट आणि "लोकाग्रहास्तव' जावे सत्तेच्या उपरोक्त द्रुतगती मार्गावर, की राहावे ठेवलिये अनंते तैसेचि समाधान असेच चित्ती ठेवत... 
टू बी ऑर नॉट टू बी..! 
एका बाजूला हे विधात्या, 
तू आमच्यावर खंडणीचे आरोप करणाऱ्यांच्या विरोधात दोन रागेभरले शब्दही उच्चारत नाहीस... 
मग का उचलत राहावी हयातभर आम्ही तुझी सदानानाची तळी...? 
तर दुसऱ्या बाजूस ही जीयसटी फीयसटी, नोटबंदीच्या जंजाळात रयतेची याचि देही याचि डोळा पाहिलेली बोळवण बघितली असतानाही कसे उतरावे परपक्षाच्या गळी? 
तद्यपि आम्हास "गळी' उतरवणारे अजोनि पैदा व्हायचे हैत!! 
अन्‌ आखिर हमारे सामने पक्ष-बिक्ष सब झाड की पत्ती, कमळ के फूल असतेच!! .. 
और वैसे भी हम "वक्त' के कौनो गुलाम नहीं... 
क्‍योंकि हम हम है! बाकी सब पानी कम है !! 
... 
आम्ही कोलतो सारी बंधने, सारी रंजिशे, का की आम्ही नटसम्राट तथा जेम्स बॉन्ड होत...!! 
डोळ्यात आमच्या लोकसभेचा निखार अजूनी ये विखार बाकी है!! 
ईष्णू दत्तात्रेय तथा ईडी-फिडीसही आम्ही कोलत असतोय ...!! 
का की आमच्या वर ईडीसारखं तथा यड्यासारखं प्रेम करणारी ही रयत आहे..ती असेपर्यंत आम्ही कोण्णा-कोण्णासच डरत नाही...डरणार नाही!! 
त्या लोकसभेत कोणी आमचे काम केले, कोणी नाही..आम्ही पुरते जाणून असतोय.. 
बिकॉज आय एम बॉंड -जेम्स बॉंड..असो.. !! 
सब का "टाइम' आता है..अपना भी आयेगा!! 
तब बराबर बदला लेगा ये फैजल..!! 
कोण्ण जातो त्याला जाऊद्या.. यंत्तात त्याला यूद्या.. 
तथापि पद-बिद तसंही आम्ही कोलत असतोय!! 
कॉलर उडवून!! 
का की लोकशाही असो की राजेशाही इथं रयतच सुप्रीम असते, बेट्यांनो..!! 
त्यांच्या आग्रहास्तव आम्ही कैच्या क्काय करू..!! 
पर ही रयत असते नेमकी कोणती?? ती असते काळी-गोरी..भगवी, हिरवी, पिवळी आणि निळी.. 
असोत ..रंगूनी रंगात रंग माझा वेगळा... 
गुंतोनि पक्षात पाय माझा मोकळा...!! 
अजूनी दिल्लीच्या घराचे रंग तशेच तजेल हैत... 
भिंतीस टेकताना, हात लावताना अंगास चिकटतात हे रंग.. 
असोय, लोकसभांत लावलेल्या बोटाचा निळा रंगही तसाच तजेल आहे अजून.. 
रयतहो, तुम्ही बोटे पुनश्‍च निळ्या रंगाने ओलेती करण्यास सुसज्ज राहा..!! 
बाय द वे, यू नो माय नेम इज बॉंड-जेम्स बॉंड 007..!! 

loading image
go to top