मायणी...पांढऱ्या मातीतील पेरूचे गाव 

मायणी...पांढऱ्या मातीतील पेरूचे गाव 

कलेढोण - मायणी (ता. खटाव) हे गाव इतिहासात पक्षी आश्रयस्थान, ब्रिटिशकालीन तलावामध्ये हजेरी लावणारे फ्लेमिंगो, प्राचीनकालीन महादेव मंदिर, भुईकोट किल्ला, धार्मिकतेत यशवंतबाबा महाराज व सरुताईंचा मठ, राजकारणात माजी आमदार (कै.) भाऊसाहेब गुदगे आणि डॉ. दिलीप येळगावकर यांच्यामुळे प्रसिद्ध आहे. या शिवाय राज्याच्या पाठ्यपुस्तक मंडळाने शालेय अभ्यासक्रमातही ज्याची नोंद घेतली आहे. वर्तमानकाळातही ज्याची आंबट-गोड चव महाराष्ट्रात पसरली आहे, तो मायणीचा पांढऱ्या मातीतील पेरू. 

सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले मायणी हे गाव. अलीकडच्या दशकात गावातील लोक ग्रामीण जीवनाकडून शहरी जीवनाकडे वळत आहेत. येथे झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक बदलांमुळे शेती व्यवसायही बदलला आहे. कमी पाण्यावर चालणारी शेतीही येथे केली जाते. त्यात डाळिंब, द्राक्षे व पेरू बागांचा समावेश होतो. गावातील विशेषतः माळी समाज पेरूच्या बागांतून खोबऱ्याच्या चवीच्या पेरूचे उत्पादन घेतो. शेतीच्या पाणी समस्येमुळे दुष्काळात अनेक बागायतदारांनी पेरूच्या बागा काढून टाकल्या. मात्र, अलीकडे शेतीतील तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यावर व पांढरीच्या मातीच्या गुणधर्मामुळे मायणीचा पेरू राज्यात पुन्हा नावारूपाला आला आहे. स्थानिक व्यापारी कोकणात पेरू विक्रीस घेऊन जातात. सांगली-भिगवण व मल्हारपेठ-पंढरपूर या दोन राज्यमार्गावरच्या मायणी चांदणी चौकात कायम पेरू विक्रेते व ग्राहकांची रेलचेल पाहावयास मिळते. 

मायणीच्या बागेत सरदार, लखनौ, जय विलास, लाल पेरू, पुणेरी, देशी, थायलंड आदी प्रजातींचे उत्पन्न घेतले जाते. बागेत झाडाला गोल आळे करून पांढरीमाती टाकल्याने पेरूची चव, रंग, चकाकी व पेरू जास्त टिकून राहतो. त्यामुळे मायणीच्या पेरूची चव राज्यभर पसरली आहे. या बागांना बहाराची फुले ही ऑगस्ट व जूनमध्ये येतात. मात्र, अलीकडे वर्षभर पेरूंचे उत्पादन घेतले जाते. येथील पेरूला कोकणात रत्नागिरी, मालवण, सिंधुदुर्ग, पाटण, पुणे, कऱ्हाड, विटा, वडूज आदी ठिकाणी अधिक मागणी असते. मायणीचे पक्षी आश्रयस्थान, ब्रिटिशकालीन तलावात हजेरी लावणाऱ्या फ्लेमिंगोमुळे ओळख राज्यात आणखी ठळक झाली आहे. गावाची ख्याती राज्यभर  पसरली आहे. 

""अलीकडे पांढऱ्या मातीबरोबरच रासायनिक खतांचा वापर करून वर्षभर पेरू घेतला जातो. मात्र, उन्हाळ्यात घेतलेल्या पेरूत कमी गर व बिया अधिक येतात. त्यामुळे फळ चवदार लागत नाही. पारंपरिक पद्धतीने झाडाला घातलेल्या पांढऱ्या मातीमुळे मायणीच्या पेरूची आजही राज्यभर चव टिकून आहे. 
-धनाजी माळी, पेरू उत्पादक, मायणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com