जकातवाडी बनतेय कवितांचे गाव

विशाल पाटील
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

एकेकाळी विधवा विवाह म्हटले, तर समाजाविरोधात काढलेला शब्द ठरत असे. त्या विरोधात चळवळी झाल्या, त्यापुढे जकातवाडी ग्रामपंचायतीने घेतलेला विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन देणारा धोरणात्मक निर्णय या चळवळीवरील शिरोमणीच ठरला. आता हे गाव ‘माझं कवितांचं गाव’ बनत आहे. पुरोगामी, उपक्रमशील जकातवाडी आता राज्याच्या नकाशावर येऊ पाहतेय.

सातारा शहरालगत असलेली जकातवाडी यापूर्वी सोनगाव कचरा डेपोचा धूर सहन करणारी एवढीच काय ती परिचित असायची. छोटेमोठे उपक्रम राबवून विकासाची घोडदौड सुरू ठेवलेली ही जकातवाडी प्रकाशझोतात आली, ती खऱ्या अर्थाने डिसेंबरमध्ये. ग्रामसभेने राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा वारसा जोपासत गावातील विधवेने अविवाहित तरुणाशी पुनर्विवाह केल्यास तिला २० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा पुरोगामी निर्णय घेतला. त्यामुळे ही ग्रामपंचायत राज्याच्या नकाशावर आली. 

ग्रामपंचायतीची स्थापना १९८१ मध्ये झाली. शहरालगत हे गाव असल्याने लोकसंख्या आता ४२०० वर पोचली असून, गावात अंदाजे ८०० घरे आहेत. गावाने सातत्याने नवनवे उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. युवकांची व्यसने दूर व्हावीत, यासाठी परिवर्तन संस्था व ग्रामपंचायतीमार्फत मानसमित्र समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. थर्टी फर्स्टला व्यसनाला बाय बाय करणारी शपथ घेतली. वाचन संस्कृती वाढण्यासाठी रूम टू रीड इंडिया ट्रस्ट आणि बजाज ॲटो लिमिटेडतर्फे ‘रूम टू रीड’ हा उपक्रम राबविला आहे. श्री जोतिबा, पाडळेश्‍वर देवाच्या यात्रेनिमित्त  जकातवाडी महोत्सव भरवून मनोरंजनासह हॉलिबॉल स्पर्धाही भरविल्या. लोकसहभागातून रस्त्याचे काम केले असून, शिवाय सर्व ग्रामस्थ ग्रामसभेला खुर्चीमध्ये बसतील, यासाठी १०० खुर्च्या लोकसहभागातून घेतल्या आहेत. लोकसहभागातूनच नाना-नानी पार्क उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे येथील राजश्री कांबळे या तंटामुक्‍ती समितीच्या अध्यक्षा आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी हे गाव दत्तक घेतले असल्याने या गावात शासकीय उपक्रमही प्रभावीपणे राबविले जात आहेत.

गावातील प्राथमिक शिक्षक प्रल्हाद पार्टे यांच्या संकल्पनेतून आता हे जकातवाडी कवितांचे गाव बनू पाहत आहे. भिलार पुस्तकांचे गाव बनल्यानंतर जकातवाडीने हे उचलेले पाऊल अभिनव ठरणारे आहे. गावाने कविता पोस्टर स्पर्धा घेतल्या. त्यामध्ये दहा स्पर्धक सहभागी झाले. त्यांनी गावातील घरांच्या भिंतीवर कविता लिहून त्यावर समर्पक चित्रे काढण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी ग्रामपंचायत, विद्यावर्धिनी ग्रामवाचनालय, सार्वजनिक मंडळे, दानशूर व्यक्‍ती, कंपन्यांच्या खर्चातून हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे जकातवाडी आता स्वच्छ अन्‌ विचारांनी समृद्ध असणारे गाव बनेल.

खुले व्यासपीठ
सध्या १५० घरांवर कविता लिहिण्याचे नियोजन केले असून, आता त्यास अजूनही आर्थिक पाठबळ मिळण्याची तसेच चित्रकार मिळण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी लोकांनी पुढे यावे. येथे काढलेली चित्रे कायमस्वरूपी राहणार असल्याने त्या चित्रकारांसाठी हे कायमस्वरूपी खुले व्यासपीठ राहील, असे प्रल्हाद पार्टे यांनी सांगितले.

पुनर्विवाह करणाऱ्या विधवा महिलेस २० हजार रुपयांची मदत, आता कवितांचे गाव असे पुरोगामी, नावीन्यपूर्व निर्णय घेऊन आमचे गाव समृद्ध करत आहोत. त्याला गावकऱ्यांची साथ मिळत आहे.
-चंद्रकांत सणस, सरपंच, जकातवाडी

Web Title: My village is different jakatwadi different village to other village