55 लाखांच्या चोरीचे गूढ 

The mystery of theft of 55 lakhs
The mystery of theft of 55 lakhs

पारनेर : तालुक्‍यातील जामगावचे रहिवासी व मुंबईत वास्तव्यास असलेले सूर्यभान ऊर्फ सुरेश धुरपते यांच्या मोटारीतून (बुधवारी) रात्री 55 लाख रुपयांची चोरी झाली होती.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी अजित पाटील व सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यात धुरपते यांच्या वाहनाचा चालक आणि त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
गुन्ह्यात आणखी दोघांचा समावेश असल्याचा संशय आहे. 

सुरेश धुरपते यांच्या पत्नी सुनंदा पारनेर पंचायत समितीच्या सदस्य आहेत. ताब्यात घेतलेले चार जण हे तालुक्‍यातीलच पिंपळगाव तुर्क, तसेच काही श्रीगोंदे तालुक्‍यातील आहेत. 

धुरपते हे काल (मंगळवारी) मुंबईतून बहीण-मेव्हण्यासह जामगावला आले होते. त्या दिवशी पहाटे त्यांच्या वाहनात ठेवलेली 55 लाखांची रक्कम असलेली बॅग चोरीस गेली. बुधवारी पारनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. 

जमीनखरेदीसाठी धुरपते यांनी ही रक्कम मोटारीतून (एमएच 43 बीएन 4545) आणली होती. घरात ठेवली तर चोरी होऊ शकते. त्यामुळे ही रक्कम वाहनात पाठीमागील सीटवर ठेवून वाहन लॉक केले. डाव्या बाजूच्या दरवाजाजवळची काच फोडून चोरट्यांनी बॅग चोरली. 

चालकच असावा चोरांचा "संचालक' 
विभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. धुरपते यांनी रक्कम काढल्यापासूनच चालकाचा रकमेवर डोळा होता. मात्र, धुरपते मुंबईहून एकटे न येता बहीण व मेव्हण्याबरोबर आल्याने चालकास वाटेत काही करता आले नाही. बेलवंडी फाट्यावर आल्यावर डिझेल भरण्यासाठी त्याने वाहन थांबविले. चालक लघुशंकेसाठी गेला. तेथेच त्याने ही खबर साथीदारांना पुरवली असावी. धुरपते यांनी ती रक्कम असलेली बॅग वाहनातच ठेवल्याचे केवळ चालकास माहिती होते. त्याने साथीदारांच्या मदतीने रात्री ही रक्कम लांबविली असावी, असे धुरपते यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

ताब्यात घेतलेला चालक आणि त्याचे साथीदार या घटनेशी आमचा काहीही संबंध नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. पोलिसांची संशयाची सुई चालकावर असली तरी दुसरीही शक्‍यता पडताळून पाहत आहेत. 

पोलिसांनी घेतला नोटांचा तपशील 
दरम्यान, पोलिसांनी चालकासह चार आरोपी ताब्यात घेतले आहेत. एक श्रीगोंद्यातून, तर तीन पुणे येथून काही रकमेसह ताब्यात घेतले आहेत. आता आणखी चार आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत. या गुन्ह्यात वापरलेली एक स्कॉर्पिओ ताब्यात घेतली आहे. आणखी एक कार व एक दुचाकीही यात वापरली असल्याचा पोलिसांना संशय आहे. ती वाहने व उर्वरित रक्कम, तसेच चार आरोपी ताब्यात घेणे बाकी आहे. धुरपते यांनी ही रक्कम कोठून आणली, याचा सविस्तर तपशील पोलिसांना दिला आहे. किती रुपयांच्या किती नोटा आहेत, हाही तपशील पोलिसांना दिल्याने, पोलिसांचा जो प्रथम संशय होता. ही रक्कम घरातून चोरी जाईल, या शक्‍यतेनेच ती गाडीत ठेवल्याचे धुरपते पोलिसांना सांगत आहेत. 
पोलिसांकडून अधिकृत माहिती न समजल्याने या चोरीचे गूढ वाढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com