माधवनगर जकात नाक्‍याच्या जागेबाबत गुढ कायम 

Mystery about Madhavnagar Jakat Naka's place remains
Mystery about Madhavnagar Jakat Naka's place remains

सांगली : महापालिकेची कोल्हापूर रोडवरील जकात नाक्‍याची जागा भाडेपट्टीने देण्याचा ठराव सत्ताधारी भाजपने केला. पण याच जागेवर आपत्ती निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्याचा आराखडा तयार करून शासनाकडेही सादर केला आहे. तरीही सत्ताधाऱ्यांनी भाडेपट्टीचा ठराव करून जागा लाटण्याचा डाव आखल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. माधवनगर रस्ता जकात नाक्‍याच्या जागेचा फैसल्याबाबत मात्र गुढ कायम आहे. 

महापालिकेच्या जकात नाक्‍याच्या जागा भाडेपट्टीने देण्याचा ठरावावरून सध्या वादळ उठले आहे. भाजपच्या गोटातूनही ठरावाबाबत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. माधवनगर जकात नाक्‍याची जागा दहा ते बारा गुंठे इतकी आहे. त्यावर पाचशे फुटाचे पत्र्याचे शेड आहे. केवळ या शेडचे भाडे आकारून संपूर्ण जागा भाड्याने देण्याचा घाट घातल्याचे बोलले जात आहे. 

दुसरीकडे कोल्हापूर रोडवरील जकात नाका व त्यामागील जवळपास दीड एकर जागेवर नगरसेवकांचा डोळा आहे. हा जकात नाकाही भाडेपट्टीने देण्याचा ठराव घुसडण्यात आला. पण याच जागेवर आपत्ती निवारा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आयुक्त नितीन कापडणीस यांनी तयार केला आहे. महापूराच्या काळात नागरिकांनी शाळा, खासगी जागेत स्थलांतरीत करावे लागते. एकापेक्षा अधिक ठिकाणी स्थलांतर केल्याने त्यांच्या जेवणासह इतर सुविधा पुरविण्यात धावाधाव होते. त्यासाठी निवारा केंद्र उभारून तिथे एक हजारहून अधिक लोकांची सोय केली जाणार आहे. 

मंगल कार्यालयाच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. इतर वेळी या केंद्राचा उपयोग मंगल कार्यालयासाठी होऊ शकतो. त्यातून महापालिकेला उत्पन्नही मिळू शकते. केवळ सांगलीसह कुपवाड व मिरज येथेही निवारा केंद्र उभारण्याचा एकत्रित प्रस्ताव तयार करून तो शासनाला सादर करण्यात आला आहे. तरीही सत्ताधाऱ्यांनी परस्परच ठराव करून ही जागा भाडेपट्टीने देण्याचा घाट घातला आहे. 

कोवीड सेंटरमुळे जागेवर नजर 
कोल्हापूर रोडवरील आदिसागर मंगल कार्यालयात महापालिकेने कोवीड सेंटर उभारले होते. तर जकात नाक्‍याच्या शेडचे दुरूस्ती करून तिथे संपर्क केंद्र सुरू केले होते. कोवीड सेंटरच्या कामानिमित्त नगरसेवकांची याठिकाणी ये-जा वाढली होती. त्यातूनच ही जागा त्यांच्या नजरेत बसली आणि ती भाडेपट्टीने देण्याचा ठराव करण्यात आल्याची चर्चाही पालिका वर्तुळात सुरू आहे.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com