डॉ. एन. डी. पाटील यांची मोटार चोरीस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची रुईकर कॉलनीतील बंगल्याच्या दारात लावलेली मोटार सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिस यंत्रणेने सीसीटीव्हीसह विविध पथकांद्वारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्हीतील चित्रीकरणाद्वारे हे कृत्य तीन ते चार चोरट्यांच्या टोळीने केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. 

कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची रुईकर कॉलनीतील बंगल्याच्या दारात लावलेली मोटार सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिस यंत्रणेने सीसीटीव्हीसह विविध पथकांद्वारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्हीतील चित्रीकरणाद्वारे हे कृत्य तीन ते चार चोरट्यांच्या टोळीने केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, रुईकर कॉलनीत डॉ. एन. डी. पाटील यांचा बंगला आहे. त्यांची "सिल्की गोल्ड' रंगाची (एमएच 09 बीएक्‍स 6929) मोटार आहे. ती गेली पाच वर्षे ते वापरत आहेत. सध्या त्यांच्या बंगल्याच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांनी मोटार काल रात्री दारातच रस्त्यावर लावली होती. मध्यरात्री 2 वाजून 11 मिनिटांनी एका मोटारीतून चोरटे त्यांच्या दारात आले. त्यातील तिघे जण खाली उतरले. त्यांनी बॅटरीच्या साहाय्याने पाटील त्यांच्या बगल्याच्या गेटच्या आत जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर ते गाडीतून निघून गेले. चोरट्यांची मोटार पुन्हा 2.40 वा. बंगल्याजवळ आली आणि पुन्हा निघून गेली. त्यानंतर 2.57 वा. मोटार पुन्हा तेथे आली. त्यातून तिघे जण खाली उतरले. एकाने पाटील यांच्या मोटारीच्या दरवाजाचे लॉक तोडून काढले. त्यांच्यातील एकजण त्यात बसला. त्यानंतर इतर दोघे चोरटे पुन्हा आपल्या गाडीत बसले आणि तेथून निघून गेले. 3 वाजून 3 मिनिटांनी ते पुन्हा तेथे आले. पाटील यांच्या मोटारीत बसलेल्या चोरट्याने मोटार सुरू केली. पुढे झाड असल्याने त्याने ती मागे घेऊन तो तेथून ताराराणी चौक ते शिरोली रस्त्याच्या दिशेने निघून गेला. त्याचा पाठीमागे चोरट्यांची गाडी गेली. 

आज सकाळी एन. डी. पाटील यांचा चालक निलेश नथुराम नकाती यांना दारात मोटार नससल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती पाटील परिवाराला दिली. त्यानंतर याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. डॉ. पाटील यांची मोटार चोरीस गेल्याचे समजताच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. शाहूपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानेही तपासास सुरवात केली. पाटील यांच्या बंगल्यासह शहरात लावलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांच्या टोळीचा पोलिसांनी शोध सुरू केला. सकाळी खुद्द पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी पाटील यांच्या घरात जाऊन कुटुंबीयांकडून माहिती घेतली. 

मोटारीत ओळखपत्र, फोटो आणि पुस्तके... 
चोरीस गेलेल्या मोटारीत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे माजी आमदार असलेले ओळखपत्र, फोटो आणि पुस्तके होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हे ओळखपत्र त्यांना दिले होते. 

नाइट मोड अडथळा... 
सेफ सिटी अंतर्गत शहरात कोट्यवधी रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या काळात बसविण्यात आले आहेत. मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना नाइट मोड नसल्याने रात्रीचे चित्रीकरण स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे यापूर्वीचेही गुन्हे उघडकीस करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. मोटार चोरीच्या टोळीचा छडा लावण्यातही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून सीसीटीव्हीची यंत्रणा कशाला उभारली, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत होता. 

मोटार कर्नाटकात गेल्याचा संशय 
चोरटे मोटार घेऊन शेजारील कर्नाटक राज्यात गेल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्यानुसार त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार पोलिसांकडून घेतला जात आहे. 

चोरट्यांची टोळी... 
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोटार चोरी करणाऱ्यांची संख्या चार ते पाच असावी. मोटार चोरीचे कृत्य करताना दोघे दिसत असले तरी ते ज्या मोटारीतून आले होते, त्यात किमान आणखी दोन ते तीन जण असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: N. D. Patil car stolen