आषाढी वारीसाठी नगर आगार 300 जादा गाड्या सोडणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

आषाढी एकादशीनिमित्त अहमदनगर विभागातर्फे सुमारे 300 जादा गाड्या पंढरपूरसाठी सोडण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्या तारकपूर बस स्थानकातून सोडण्यात येत आहेत.​

नगर : उद्या (शुक्रवार) आषाढी एकादशी असल्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातून एस.टी.ने पंढरपूरला जाण्यासाठी भाविक बसस्थानकावर गर्दी करत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्व भाविकांसाठी पंढरपूरला जाण्य़ासाठी एस.टी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आषाढी एकादशीनिमित्त अहमदनगर विभागातर्फे सुमारे 300 जादा गाड्या पंढरपूरसाठी सोडण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्या तारकपूर बस स्थानकातून सोडण्यात येत आहेत. तारकपूर येथे पंढरपूर यात्रेनिमित्त स्वतंत्र वाहतूक कक्ष उभारण्यात आले नाही. या कक्षात साहाय्यक वाहतूक अधीक्षक दादासाहेब महाजन, सांख्यिकी अधिकारी अनिता कोकाटे, तारकपूर बस स्थानकाच्या प्रमुख मनीषा देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व जादा बसेस सोडण्यात येत आहे.

दरवर्षीच होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी एस.टी. प्रशासनाने भाविकांची चेंगराचेंगरी होऊ नये व भाविकांच्या साहित्याची चोरी होऊ नये, यासाठी सर्व भाविकांना रांगेत उभे करून बसमध्ये बसविण्यात येत आहे. तसेच माळीवाडा बस स्थानकामध्ये जिल्ह्यातील इतर भागातून येणाऱ्या भाविकांना तारापूर येथे आणून त्यांना पंढरपूरकडे रवाना केले जात आहे. पंढरपूरहून येणाऱ्या परतीच्या भाविकांनाही माळीवाडा व तारकपूर बस स्थानकात सोडले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar bus depot leave 300 additional buses for Aashadhi Ekadashi Yatra