मोकाट जनावरांकडून जळत्या मृतदेहांची हेळसांड

nagar citizens faces issue of animals
nagar citizens faces issue of animals

नगर : शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या मोकाट जनावरांच्या त्रासाने आधीच हैराण झालेल्या नगरकरांना आता मोकाट जनावरांच्या भलत्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अमरधाम स्मशानभूमीत ही जनावरे वळल्याने तेथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. माणसांच्या गर्दीत ही जनावरे शिरत असल्याने अंत्यसंस्कारासाठी जमलेले नातेवाईक, आप्तेष्टांचेही हाल होत आहेत. मात्र, त्याकडे लक्ष देण्यास महापालिका प्रशासनाला वेळ नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

मोकाट जनावरे आणि कुत्र्यांच्या त्रासाने नगरकर हैराण आहेत. त्यात बहुतांश जनावरांचे मालक सकाळीच या जनावरांना रस्त्यावर सोडून देतात. नगरकर त्यांना मोकाट समजून चारा घालतात; परंतु त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींचे कोणालाच सोयरसुतक नाही. कचराकुंड्यांवरील अन्नपदार्थ ही जनावरे खातात. त्याच जनावरांचे दूध विकणारे नगरमध्ये आहेत.

अमरधामप्रमाणेच नगरमधील पत्रकार चौक ते दिल्ली गेटदरम्यान, तसेच माळीवाडा भागात मोकाट जनावरांचा त्रास मुख्यत्वे जास्त आहे. सकाळी घराबाहेर पडून धावत-पळत कामाच्या ठिकाणी कार्यालयात पोचण्याची घाई असलेले सरकारी, निमसरकारी व खासगी चाकरमाने, शालेय विद्यार्थी यांना या जनावरांनी केलेल्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यातच एखादी रुग्णवाहिका आल्यास तिला रस्ता करून देण्यासाठीही जागा शिल्लक राहत नाही. मात्र, याकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जुनी वसंत टॉकीज रस्ता, वाडिया पार्कसमोरही वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या जनावरांची संख्या मोठी आहे.

रचलेले सरणही पाडण्याचा प्रयत्न
नालेगावच्या अमरधाम स्मशानभूमीत गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कारानंतर एका मृतदेहाला अग्निडाग दिला. नातेवाईक थोड्या वेळाने निघून जात असताना एका जनावराने रचलेल्या सरणातील लाकडे पाडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी दुसऱ्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या व्यक्तीने ही जनावरे हाकलली. त्यामुळे हा विधी पूर्ण होऊ शकला. अन्यथा अंत्यसंस्कार करून गेलेल्या "त्या' परिवारास वेगळ्याच यातना सहन कराव्या लागल्या असत्या...!

शहरातील मोकाट जनावरांच्या प्रश्‍नावर यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली. मात्र, प्रशासन त्याकडे डोळेझाक करते. मोकाट म्हणविल्या जाणाऱ्या जनावरांच्या मालकांवर कोणतीच कारवाई होत नाही. मागणी करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे नगरसेवक हतबल आहेत. वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारी जनावरे आता थेट अमरधाम स्मशानभूमीतही घुसली आहेत. त्यातून अंत्यसंस्कारास आडकाठी येते. हे अत्यंत दुर्दैवी आहे.
- गणेश भोसले, ज्येष्ठ नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com