अवघे धावले नगरकर! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

नगर - भारत माता की जय... अशा घोषणा देत कारगिल युद्धातील हिरो ठरलेल्या मेजर डी. पी. सिंग यांच्यासमवेत आज भल्या पहाटे अबाल-वृद्ध धावले. सुमारे चार ते पाच हजार नगरकरांनी एकता दौडमध्ये सहभाग घेतला. 

नगर - भारत माता की जय... अशा घोषणा देत कारगिल युद्धातील हिरो ठरलेल्या मेजर डी. पी. सिंग यांच्यासमवेत आज भल्या पहाटे अबाल-वृद्ध धावले. सुमारे चार ते पाच हजार नगरकरांनी एकता दौडमध्ये सहभाग घेतला. 

छत्रपती शाहु प्रतिष्ठान सावेडीतर्फे आज एकता दौड मॅरेथॉनचे आयोजन केले होते. प्रोफेसर कॉलनी चौक, प्रेमदान चौक, इस्सार पेट्रोलपंप चौक, भूतकरवाडी, दीपक पेट्रोलपंप, सेंट मोनिका अध्यापक विद्यालय, तोफखाना पोलिस ठाणे, प्रोफेस कॉलनी चौक अशी चार किलोमीरटची एकता दौड झाली. कारगिल युद्धातील हिरो आणि देशातील पहिले ब्लेड धावपट्टू मेजर डी. पी. सिंग एकता दौडचे आकर्षण आणि प्रेरणा ठरले. छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष सीए राजेंद्र काळे यांनी मेजर डी. पी. सिंग, एसीसी कमांडर नीरज कपूर यांचे स्वागत केले. तर, सारेगमप फेम अंजली-नंदिनी गायकवाड यांच्या सुमधूर गीत गायनाने नगरकरांचा उत्साह वाढविला. 

तिरंगा ध्वज फडकून दौडला सुरूवात झाली. भूतकरवाडी चौकात माजी महापौर अभिजित कळमकर यांनी एकता दौडचे वाजत-गाजत स्वागत केले. तर, एका मित्रमंडळाने धावपट्टूंना पाण्याची व्यवस्था केली होती. तोफखाना पोलिस चौकात नगरसेवक योगिराज गाडे यांनी स्वागत केले. मॅरेथॉनमध्ये चार वर्षांच्या मुलापासून 85 वर्षांच्या वृद्धांपर्यंत नगरकर सहभागी झाले होते. मेजर डी. पी. सिंग यांच्यापुढे कोणीही धाव घेतली नाही कारण ही एकता दौड होती. दौडमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सुमारे पाच हजार नगरकांनी एकता दौड पूर्ण केली. 

यावेळी एसीसी कमांडर मेजर जनरल नीरज कपूर म्हणाले, "एकता दौडमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक धावपट्टूचा जोश देश भावना, देशाविषयीचे प्रेम जाहीर करीत आहे. मेजर सिंग यांच्यामुळे प्रत्येकामधील उत्साह वाढला आहे.'' 

सीए राजेंद्र काळे म्हणाले, "ऐतिहासिक नगर शहरामध्ये मेजर डी. पी. पहिल्यांदाच आले आहेत. मॅरेथॉनमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, विविध मंडळांनी सहभाग घेतला. ही मॅरेथॉन नसून एकता दौड आहे.'' यावेळी श्‍वेता गवळी, अंजली वल्लाकट्टी, सुनील जाधव आदींसह सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक सहभागी झाले होते. दौड संपल्यानंतर शाहु प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी प्रोफेसर कॉलनी चौकामधील कचरा उचलून टाकला. 

Web Title: nagar ekta marathon