नगरमध्ये पकडला साडेसहा क्विंटल गांजा;पाच जणांना अटक

सूर्यकांत नेटके
शनिवार, 17 जून 2017

भरधाव वेगाने जाणारी दोन वाहने हात करुनही थांबले नसल्याने पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्या दोन्ही वाहनाच्या तपासणी पोलिसांना सुमारे सहा क्विंटल 43 किलो 500 ग्रम गांजाची 286 पाकिटे आढळून आली. पकडलेल्या गांजाची 96 लाख 52 हजार पाचशे रुपये किंमत आहे.

नगर- भरधाव वेगाने जाणारी दोन वाहने हात करुनही थांबले नसल्याने पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्या दोन्ही वाहनाच्या तपासणी पोलिसांना सुमारे सहा क्विंटल 43 किलो 500 ग्रम गांजाची 286 पाकिटे आढळून आली. पकडलेल्या गांजाची 96 लाख 52 हजार पाचशे रुपये किंमत आहे. पोलिसांनी दोन्ही वाहनासह 86 हजार पाचशे रुपये रोख असा एक कोटी 14 लाख 39 हजार
रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन पुरुष व दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तोफखाना पोलिसांनी आज सकाळी साडेसहा वाजता ही कारवाई केली.

नगर- औरंगाबाद रस्त्यावर तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर हे सहकाऱ्यांसह गस्त घालत होते. आज सकाळी साडेसहा वाजता पोलिस पथक सनी पॅलेस हॉटेल परिसरात असताना औरंगाबादकडून नगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा (एमच एच 24, व्ही 1699) व बोलेरो (एमएच 17 एजे 6943) या दोन्ही थांबण्याची विनंती करत हात दाखवला. मात्र त्या वाहनाच्या चालकांनी वाहने न थांबवता वेगाने नगर शहराकडे नेली. त्यामुळे पोलिसांनी या वाहनाचा संशय आल्याने पाठलाग सुरु केला. पंधरा ते वीस मिनिटाच्या पाठलगानंतर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याजवळ असलेल्या आशा टॉकीज चौकात ही दोन्ही वाहने पोलिसांनी अडवली. त्यात वाहनाची झडती घेतली असता इनोव्हा गाडीत चालकासह एक महिला व एक पुरुष तर बोलेरो गाडीत दोन पुरुष व एक महिला आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केल्यावर त्यात गांजाची पॉकिंग केलेली पाकिटे आढळून आली. इनोव्हात 150 पाकिटे तर बोलेरोत 136 अशी 286 पाकीटे पोलिसांनी ताब्यात घेतली. त्या प्रत्येक पाकीटाचे वजन सव्वा दोन किलो आहे. आरोपाच्या झडतीत 86 हजार 500 रुपये रोख रक्कम पोलिसांना मिळून आली. पोलिसांनी 96 लाख 52 हजार पाचशे रुपये किमतीचा गांजा, सतरा लाख रुपये किमतीचे दोन्ही वाहने व 86 हजार पाचशे रुपये रोख असा एक कोटी 14 लाख 39 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची प्रती किलो पंधरा हजार रुपये किंमत आहे.

याप्रकरणी सिमा राजू पांचारिया (वय 46, रा. कासार दुमाला ता. संगमनेर), शोभा कृष्णा कोकाटे (वय 28, रा. नालेगाव, नगर), संदीप दिलीप अनभुले (वय 28, रा. घुमरी ता. कर्जत), सागर भिमाजी कदम (रा. 28, रा. आश्‍वी, ता. संगमनेर), गणेश निवृत्ती लोणारी (वय 36, रा. जोर्वे, ता. संगमनेर) या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस निरिक्षक मानगावकर यांच्यासह पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय इस्सर, योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, धिरज
अभंग, भास्कर गायकवाड, दिलीप गायकवाड, संजय काळे, हारुण शेख, छाया आढाव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

उस्मानाबादवरुन आणला गांजा
नगर शहरात एक कोटी रुपये किमतीचा गांजा पहिल्यादाच पकडला आहे. त्यामुळे नगर शहरात गांजाची तस्करी करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पोलिस तपासात अनेक गंभीर बाबी उघड होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. गांजा घेऊन येणारी दोन्ही वाहने औरंगाबादवरुन येत असली तरी हा गांजा उस्मानाबादवरुन आनल्याची शक्‍यता पोलिस निरिक्षक मानगावकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Nagar news 1 crore worth of ganja seized