बंधाऱ्यातील पाण्यात बुडून बहिण-भावाचा मृत्यू

हरिभाऊ दिघे
रविवार, 10 सप्टेंबर 2017

'इथ' होती 'कुठं' गेली...
शेतात सोबत आलेली चिमुकली मुले पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली. त्यामुळे 'इथ' होती 'कुठं' गेली... म्हणण्याची दुर्दैवी वेळ मुक्ताबाई कानवडे या मातेवर आली. अंत्यसंस्कार समयी माता - पित्याच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली.

तळेगाव दिघे (जि. नगर) : शेतानजीकच्या दगडी बंधाऱ्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोघा बहिण-भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ओम भाऊराव कानवडे (वय ९) व तेजल भाऊराव कानवडे (वय ११) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी रात्री पावणेसातच्या सुमारास सावरगावतळ (ता. संगमनेर) शिवारात ही घटना उघडकीस आली.

सावरगावतळ येथील ओम भाऊराव कानवडे ( वय ९ ) व तेजल भाऊराव कानवडे ( वय ११ ) हे प्राथमिक शाळेत शिकणारे बहिण-भाऊ शनिवारी दुपारी सुट्टी असल्याने आई समवेत शेतात गेले होते. आईची नजर चुकवून ते सायंकाळच्या सुमारास शेतानजीकच्या दगडी बंधाऱ्यावर आंघोळीसाठी गेले. दरम्यान त्यांची आई मुक्ताबाई कानवडे सायंकाळी घरी पोहचल्यावर मुले घरी नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर या मुलांची चौकशी सुरु झाली. आजोबा धोंडीबा कानवडे यांनी नातवांचा शोध घेतला असता दगडी बंधाऱ्यानजीक मुलांचे कपडे आढळले. ओम कानवडे याचा मृतदेह बंधाऱ्यातील पाण्यावर तरंगलेला आढळला. मुलगी तेजल कानवडे हिचा मृतदेह बंधाऱ्यात आढळून आला.

ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढत पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर धांदरफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. बाळसाहेब राधू कानवडे यांनी पोलिसांत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत ओम हा तिसरीत तर, तेजल पाचवीत शिकत होती. मयत बहीण - भावावर रात्री शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. या धक्कादायक घटनेने मुलांच्या माता - पित्यासह आजोबास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

'इथ' होती 'कुठं' गेली...
शेतात सोबत आलेली चिमुकली मुले पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली. त्यामुळे 'इथ' होती 'कुठं' गेली... म्हणण्याची दुर्दैवी वेळ मुक्ताबाई कानवडे या मातेवर आली. अंत्यसंस्कार समयी माता - पित्याच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली.

Web Title: Nagar news 2 children drown in lake at sangamner