आरोपी भवाळला दहा हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

वकिलाच्या गैरहजेरीबाबत न्यायालयाची दिशाभूल केल्याचा ठपका

वकिलाच्या गैरहजेरीबाबत न्यायालयाची दिशाभूल केल्याचा ठपका
नगर - कोपर्डी अत्याचार व खून खटल्याच्या सुनावणीला आज आरोपी संतोष भवाळचे वकील ऍड. बाळासाहेब खोपडे गैरहजर होते. पोलिसांनी बंदोबस्त न दिल्याने हजर राहणार नसल्याचा अर्ज आरोपी भवाळच्या भावाने न्यायालयात दिला होता. मात्र ऍड. खोपडे यांना पुणे व नगर पोलिसांनी बंदोबस्तासाठी सुरक्षारक्षक दिल्याचे पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेने न्यायालयात लेखी दिले. त्यामुळे भवाळने न्यायालयाची दिशाभूल करत खोटा अर्ज दिल्याचे स्पष्ट करून, न्यायालयाने भवाळ याला दहा हजार रुपयांचा दंड केला; तसेच ऍड. खोपडे यांना पोलिस बंदोबस्त होता किंवा नाही, याबाबत चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश पोलिस अधीक्षकांना दिला.

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने "यशदा'चे माजी अधिकारी रवींद्र चव्हाण यांची साक्ष नोंदविण्यास आरोपीला परवानगी दिली आहे. मागील वेळी (17 ऑगस्ट) आजारी असल्याने साक्ष देऊ शकत नाही, असे सांगून चव्हाण यांनी दहा दिवसांची मुदत घेतली होती. आज मुंबईत पावसात अडकल्यामुळे येता येत नसल्याचा अर्ज त्यांच्यातर्फे त्यांच्या मित्राने न्यायालयात आणून दिला. "चव्हाण यांनी त्यांना येता येत नसल्याचे कोणत्या फोन क्रमांकावर सांगितले,' हेही न्यायालयाने अर्जात नमूद करून घेतले.

आरोपीवर न्यायालयाच्या आवारात हल्ला झाला होता, तेव्हापासून न्यायालयात अशा संवेदनशील खटल्याच्या सुनावणीच्या वेळी पोलिस बंदोबस्त अधिक असतो. शिवाय आरोपीच्या तिन्ही वकिलांना कायमस्वरूपी एक पोलिस सुरक्षेसाठी दिला आहे. ऍड. खोपडे पुण्यात राहतात. त्यामुळे नगर हद्दीत नगरचा आणि पुणे हद्दीत पुणे पोलिसांचा एक शस्त्रधारी पोलिस कर्मचारी सुरक्षेसाठी असतो.

विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी अर्जाची चौकशी करण्याची मागणी केली. न्यायालयाने तातडीने जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांना बोलावून विचारणा केली. ऍड. खोपडे यांच्या सुरक्षेसाठी व्ही. एन. राठोड यांची नियुक्ती केली असून, ते जिल्ह्याच्या सीमेवर (शिरूर, जि. पुणे) येथे थांबलेले आहेत; तसेच पुणे पोलिसांनी राजगेनामक पोलिस नियुक्त केला असून, ते सध्या त्यांच्या सोबत आहेत, असे जिल्हा विशेष शाखेने न्यायालयात लेखी दिले.
सर्व बाबींच्या चौकशीनंतर "अर्जातील माहिती खोटी असून, आरोपी पक्षाकडून न्यायालयाची दिशाभूल केली जात आहे,' असे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपी संतोष भवाळला दहा हजार रुपयांचा दंड केला. या खटल्यात रवींद्र चव्हाण यांची साक्ष झाली, की अंतिम युक्तिवादाला सुरवात होणार आहे. येत्या चार सप्टेंबर रोजी चव्हाण यांच्या साक्षीसह अन्य सुनावणी होणार आहे.

दरम्यान, "खटला लांबविण्याचाच हा प्रयत्न आहे,' असे ऍड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: nagar news accused santosh bhawal 10000 rs. fine