शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याची हिंमत आली कुठून : अजित पवार 

विठ्ठल लांडगे
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यास सरकार अपयशी : अजित पवार

नगर : शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यास सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याची ताकद पोलिसांमध्ये आली कुठून? सरकारचे शेतकरीविरोधी धोरणामुळेच हे त्यांचे धाडस आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 

शेवगाव तालुक्‍यातील घोटण, खानापूर आदी परिसरात ऊस दरवाढीसाठी आंदोलनाचा भडका उडाला. शेवगाव शहरात काल रास्ता रोको, जाळपोळ झाली. पोलिसांनी शेतकऱ्यांमध्ये घुसविलेल्या गाडीचे आंदोलकांनी दगड मारून नुकसान केले. शेतकऱ्यांना पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. लाठ्यांचा वापर केला. एव्हढेच नव्हे, तर थेट गोळीबारही केला. यामध्ये दोन शेतकरी जखमी झाले. त्यांना नगरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी पवार यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यानंतर शेवगाव तालुक्‍यातील घोटण व खानापूर गावाला भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी आमदार संग्राम जगताप तसेच स्थानिक शेतकरी नेते उपस्थित होते. 

अजित पवार यांनी सरकारवर कडाडून टीका करीत, "सध्या शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. आर्थिक संकटात सापडला असताना ऊस दरवाढीसाठी केलेले आंदोलन मोडण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला, हे चुकीचे आहे. मुळात सरकारच शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळेच पोलिसांचे हे धाडस होते. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे,' असे पवार म्हणाले. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nagar news ajit pawar says bjp govt fails resolve farmers issues