आरोपींवर हल्ला करणाऱ्यांना पाच वर्षे सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नगर - कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणातील आरोपींवर न्यायालयाच्या आवारात हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवबा संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी 19 हजार रुपयाचा दंड ठोठावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी हा निकाल दिला.

अमोल सुखदेव खुणे (वय 25), गणेश परमेश्‍वर खुणे (वय 28, दोघेही रा. रुईधानोरे, ता. गेवराई, जि. बीड), बाबूराव वामन वाळेकर (वय 30, रा. अंकुशनगर, ता. अंबड, जि. जालना) व राजेंद्र बाळासाहेब जराड (वय 21, रा. परंडा, ता. अंबड, जि. जालना) अशी त्यांची नावे आहेत.

कोपर्डी अत्याचार व खून खटल्याच्या सुनावणीसाठी एक एप्रिल 2017 रोजी पोलिसांनी आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना न्यायालयात आणले होते. त्यांना न्यायालयाच्या आवारातून घेऊन जाताना वरील कार्यकर्त्यांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांना अडविल्याने पुढील अनर्थ टळला होता. या झटापटीत पोलिस कर्मचारी रवींद्र भास्कर टकले जखमी झाले. हा प्रकार न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. सहायक फौजदार विक्रम दशरथ भारती यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ऍड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.

Web Title: nagar news attack on prisoner crime