श्रीगोंदयात राष्ट्रवादी व भाजप नेत्यांची आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली

संजय काटे 
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

कोणी लोकांचे संसार उघड्यावर पाडले, भावाभावात भांडणे लागली हे लोक ओळखून आहेत. आम्ही पोलीस यंत्रणेचा वापर केला असता तर गेल्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पैसे वाटप करताना पकडले होते तरी सुद्धा आम्ही शांत राहिलो जर वापर केला असता तर तुमचा मुलगा आमदार दिसला नसता

श्रीगोंदे (जिल्हा नगर) - तत्कालिन मंत्री असणाऱ्या बबनराव पाचपुते भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता पाचपुते त्यांच्या पक्षात घेताना गंगेच्या तीरावर उभे करुन पावन करुन घेतले आहे काय, असा सवाल करीत जेष्ठ नेते कुंडलिकराव जगताप यांनी करीत, त्यांच्या काळातील पापे झाकण्यासाठी पाचपुते आमदार राहूल जगताप यांना बदनाम करीत असल्याचा आरोप केला. 

पत्रकार परिषदेत जगताप म्हणाले, पाचपुते यांच्या हाती काहीच न राहिल्याने ते सतत माध्यमे व जाहीर सभांमधून राहूल हे पोरकट आहेत, पाण्यासह इतर प्रश्नांचा त्यांनी पोरखेळ केल्याचे आरोप करीत असतात. मात्र हे करताना त्यांनी एकदा मागे वळून पाहिले पाहिजे. तेही तरुणपणात आमदार झाले होते त्यांचे त्यावेळची 'वाट' व 'चाल' राहूल धरीत नसतानाही खोटे आरोप करुन बदनामीचा डाव टाकला जात आहे. लोकांनी त्यांना आमदारकीत नाकारताना राहूलला पसंती दिली. हे त्यांना खुपत असून त्याचा राग धरुन अधिकाऱ्यांवर दडपशाही टाकून विकासकामात अडथळा आणत आहेत. 
मंत्रीपदाच्या काळात मोठा भ्रष्टाचार केल्याचा ज्यांनी आरोप केला तेच विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस त्याकाळातील पाचपुते यांच्या कारभाराची चौकशी विसरुन गेले आहेत. त्यांच्या पक्षात आल्यावर पाचपुते पावन झाले काय?. आमदार जगताप लोकांच्या सोईसाठी पेट्रोलपंप सुरु केला तेही त्यांना देखवत नाही. मात्र त्यांच्या काळात त्यांनी चारशे कोटीचा कारखाना, सातशे कोटीची शिक्षण संस्था कशी काढली, कुठून आला पैसा याचा हिशोब त्यांना सत्ताधारी का विचारत नाहीत. शेतकऱ्यांचे पैसे बुडविले त्याबद्दलही सरकार गप्प आहे. 

विसापुरचा समावेश कुकडीत केला, माळढोक मीच घालविले या वल्गना करुन पाचपुते स्वत:चे हसे करुन घेत असल्याचा आरोप करीत जगताप म्हणाले, सत्ता होती त्यावेळी केवळ घोषणा झाल्या. विसापुर व घोडची उंची वाढविण्याच्या घोषणा करणाऱ्यांनी आता जगताप यांच्या काळात होणाऱ्या कामांचे श्रेय घेवू नये. चांगले काम सुरु आहेत त्यात खोडा घालण्याचे उद्योग पाचपुते यांनी बंद करावेत. 

पाचपुते यांची अधिकाऱ्यांवर सराईत दादागिरी .......
जगताप म्हणाले, पाचपुते पक्षाच्या सत्तेतून जलसंपदा व पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांवर दडपण टाकून मनासारखे करुन घेत आहेत. राष्ट्रवादीचे ऋषिकेश गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा पोलिस व पाचपुते यांनी ठरवून केला होता. पोलिस अधिकाऱ्यांशी संगनमत करुन पाचपुते सराईतपणे करीत असलेले उद्योग बंद झाले नाही तर त्यांनाही उत्तर देण्याची तयारी याही वयात आहे.

तोंड उघडायला लावू नका, पाचपुते यांचा जगताप यांना इशारा 
तालुक्यात आमच्या जीवावर अनेक वेळा सत्ता भोगली आहे. पण त्याचे उपकार धरण्याऐवजी आमच्यावर टिका चालविली आहे. आपण राजकारणाच्या माध्यमातून नेहमीच विकासाचे समाजकारण केले. तोंड उघडायला लावू नका असा सज्जड दम माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी कुकडीचे संस्थापक कुंडलिक जगताप यांना दिला.
जगताप यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देणारे पत्रक पाचपुते यांच्या कार्यालयाने आज दिले. त्यात म्हटले आहे की, तालुक्यात अनेक वर्ष राजकारण करताना कधी चुकीचे वागलो नाही. जर वागलो असतो तर जनतेने आम्हाला नेता म्हणून स्वीकारलेच नसते. आम्ही राजकारण करताना नेहमीच विकासात्मक दृष्टीकोन ठेवून कामे केली आहेत. कोणाचे संसार मोडण्याचे उद्योग केले नाहीत. कोणी लोकांचे संसार उघड्यावर पाडले, भावाभावात भांडणे लागली हे लोक ओळखून आहेत. आम्ही पोलीस यंत्रणेचा वापर केला असता तर गेल्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पैसे वाटप करताना पकडले होते तरी सुद्धा आम्ही शांत राहिलो जर वापर केला असता तर तुमचा मुलगा आमदार दिसला नसता. 

पाचपुते म्हणाले, आम्ही फक्त तुमच्या वयाचे भान ठेवून गप्प आहोत याचा अर्थ असा नाही की आम्हाला काहीच बोलता येत नाही जर आम्ही तुमच्याविषयी बोललो तर तुमची पळता भुई थोडी होईल. विसापूरचा कुकडीमध्ये समावेश झाला याचेच खरे दुःख आरोप करणाऱ्यांना आहे. तुमच्या आमदार पुत्राने विसापूरच्या पाण्यासाठी, माळढोक क्षेत्र कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले. स्वतःच्या गावातील वीज केंद्र आमच्यामुळे झाले आहे  हेही जनतेला सांगावे असे आवाहन पाचपुते यांनी केले

Web Title: nagar news: bjp ncp babanrao pachpute