दरोडेखोरांच्या टोळीला श्रीगोंद्यामध्ये अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

श्रीगोंदे -  दरोडे, घरफोडी व जबरी चोऱ्या करणाऱ्या सात जणांना रविवारी रात्री श्रीगोंदे पोलिसांनी पकडले. लोखंडी टॉमीसह त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरलेले जाणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. कारवाईदरम्यान तीन जण फरार झाले. 

श्रीगोंदे -  दरोडे, घरफोडी व जबरी चोऱ्या करणाऱ्या सात जणांना रविवारी रात्री श्रीगोंदे पोलिसांनी पकडले. लोखंडी टॉमीसह त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरलेले जाणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. कारवाईदरम्यान तीन जण फरार झाले. 

अनिल पंडित भोसले (वय 35, रा. कोळगाव), शाहरुख अरकास काळे (वय 25, रा. रांजणगाव, ता. पारनेर), आवेश टुक्‍या भोसले (वय 30, रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर), सचिन ऊर्फ म्हैसूर अहिल्या पवार (वय 35, रा. खडकी, ता. दौंड), विनोद सिद्धीकर चव्हाण (वय 20, रा. गुंडेगाव, ता. नगर), परश्‍या गौतम काळे (वय 30, रा. देऊळगाव गलांडे, ता. श्रीगोंदे) यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीचा त्यात समावेश आहे. 

पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार म्हणाले, ""पोलिसांनी मांडवगण ते पोही फाट्यादरम्यान रात्री पाठलाग करून आरोपींना अटक केली. त्या वेळी आरोपींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तशी संधी पोलिसांनी त्यांना मिळू दिली नाही. पाठलाग करताना उपनिरीक्षक महावीर जाधव जखमी झाले.'' ""दिवाळीत हिरडगाव येथे केलेल्या जबरी चोऱ्या, श्रीगोंदेतील घरफोड्या व जबरी चोऱ्या, बेलवंडी कोठार येथील चोरी, तसेच कर्जत, पारनेर तालुक्‍यांतील काही चोऱ्यांची कबुली आरोपींनी दिली आहे. या टोळीकडून 15हून अधिक गुन्ह्यांची उकल होणार आहे. दरोडेखोरांची ही दहा जणांची टोळी आहे.'' उपनिरीक्षक जाधव यांच्यासह अंकुश ढवळे, प्रकाश वाघ, राहुल बोराडे, रवी जाधव, अमोल आजबे, अविनाश ढेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

पारनेरमधील एक सरपंच साथीदार 
दरोडेखोरांच्या टोळीत जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांसह पुणे जिल्ह्यातील काही साथीदार आहेत. चोरीचा ऐवज ते पारनेर तालुक्‍यातील एका गावातील सरपंचाकडे ठेवत असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. हा ऐवज तो सरपंच तेथील काही ठिकाणी विकल्याचे पोलिसांना समजले.

Web Title: nagar news crime shrigonda