शाळेची दुरावस्था; मुलांना शिक्षणासाठी उन्हात बसण्याची वेळ

मार्तंडराव बुचूडे
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

येत्या 15 दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही तर आम्ही मुलांना शाळेत पाठविणे बंद करणार आहोत. -- उत्तम पठारे, सरपंच

सुपे - वाळवणे ( ता.पारनेर जि.नगर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्वच वर्ग खोल्या मुलांना बसण्यास धोकादायक असल्याने गेली दोन महिन्यांपासून या शाळेतील मुले मंदीर किंवा शाळेच्या मैदानात ऊन्हात शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. शाळेसाठी लवकरात लवकर वर्ग खोल्या बांधून द्याव्यात अशी, मागणी येथील पालकांनी केली आहे.

वाळवणे शाळेची भिंत ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडयात झालेल्या जोरदार पावसाने पडली. इतर वर्गही विद्यार्थ्यांना बसण्यासाठी धोकादायक झाल्याने मुले भर उन्हात ज्ञानाचे धडे गिरवत आहेत.  या शैक्षणिक दुरावस्थेकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने  पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नगर- पुणे महामार्गावरील सुपे पासून तीन किलोमीटरवर वाळवणे आहे. येथे पहीली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेत एकशे पाच मुले शिक्षण घेत असून चार शिक्षक आहेत. शाळेची इमारत १९५१ साली बांधण्यात आली असून पावसाने इमारतीची एक भिंत कोसळली आहे. मात्र अद्यापही मुलांसाठी नविन शाळा खोल्यांसाठी ठोस पाऊले ऊचलली नाहीत, त्यामुळे ही मुले ऊघड्यावर शिक्षण घेत आहेत.

भिंत पडल्यानंतर सरपंच उत्तम पठारे, देवस्थानचे अध्यक्ष सचिन पठारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरक्षनाथ दरेकर, केंद्र प्रमुख बाळासाहेब साबळे यांच्यासह ग्रामस्थांनी पहाणी करूण इमारत बसण्यास योग्य नसल्याने  मुलांना मंदीरात किंवा शाळेच्या मैदानात झाडाखाली बसविण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत मुले तेथेच शिक्षण घेत आहेत. दरम्यान शाळेसाठी आपण काहितरी दिले पाहिजे या उदात्त भावनेतून नुकत्याच झालेल्या स्नेहसंमेलनात ग्रामस्थांनी १७ हजार रुपये शाळेसाठी दिले. एकीकडे ग्रामस्थ शाळेसाठी प्रयत्नशिल असतांना जिल्हापरीषद मात्र उदासिन आहे.

शाळेची इमारत धोकादायक असल्याची माहिती पारनेर पंचायत समितीच्या शिक्षण आधिकारी यांना आठ महिन्यापूर्वी दिली होती.  इमारत ६५ वर्षाची  झाली असून भिंतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. मात्र शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे आज मुलांना मैदानावर ऊन्हातान्हात शिक्षण घ्यावे लागत आहे

येत्या 15 दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही तर आम्ही मुलांना शाळेत पाठविणे बंद करणार आहोत. -- उत्तम पठारे. सरपंच, वाळवणे.

पारनेर तालुक्यात 48 शाळांसाठी 105 शाळा खोल्यांची नितांत गरज आहे. तसा प्रस्ताव आम्ही जिल्हा परीषदेस पाठविला आहे. तालुक्यातील शाळांना प्राधान्यक्रमाणे शाळा खोल्या देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. तालुक्यातील वाळवणे येथील मुले मंदीरात, शहांजापूर येथील पहीली ते पाचवी अखेरची मुले एकाच छोट्या खोलीत, पारनेर येथील मुलींचा शाळा आंबेडकर भवनात व एका गाळ्यात तर भाळवणी येथील मुले माध्यमिक विद्यालयाच्या ईमारतीत बसविण्यात येत आहेत

- जयश्री कार्ले. गटशिक्षणाधिकारी, पारनेर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagar news: education school