शेततळे खोदून अनेक शेतकरी सरकारी अनुदानापासून वंचित

हरिभाऊ दिघे
गुरुवार, 27 जुलै 2017

कृषी खात्याची पूर्वी शेतकऱ्यांसाठी अगोदर शेततळे करा व नंतर अनुदान घ्या, अशी योजना होती. एका शेततळ्यासाठी एक लाख ७५ हजार अनुदान दिले जात होते. या योजनेच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी 'ऑनलाईन नोंदणी' करीत शेततळे खोदले, त्यात कागद टाकला.

तळेगाव दिघे (जि. नगर) : शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी संगमनेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सरकारच्या भरवशावर कृषी विभागाकडे 'ऑनलाईन नोंदणी' करीत शेततळे खोदले. मात्र सदर शेततळ्यांसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळेना. ऑनलाईन नोंदणी करून शेततळे खोदणारे शेतकरी सरकारी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

कृषी खात्याची पूर्वी शेतकऱ्यांसाठी अगोदर शेततळे करा व नंतर अनुदान घ्या, अशी योजना होती. एका शेततळ्यासाठी एक लाख ७५ हजार अनुदान दिले जात होते. या योजनेच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी 'ऑनलाईन नोंदणी' करीत शेततळे खोदले, त्यात कागद टाकला. मात्र अनुदाना देण्यासाठी कृषी खात्याकडून आता 'हात वर' केला जात आहे. शिवाय सरकारने 'मागेल त्याला शेततळे' नवीन योजना सुरु केली आहे. या योजनेत ऑनलाईन नोंदणी करून शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही. त्यासाठी नवीनच शेततळे खोदणे आवश्यक आहे.

सामुदायिक शेततळ्यासाठी सोडतीद्वारे निवड केली जाणार आहे. त्यामुळे सरकारच्या भरवशावर 'ऑनलाईन नोंदणी' करीत शेततळे खोदलेल्या संगमनेर तालुक्यातील सुमारे एक हजार ६०० शेतकऱ्यांना अनुदानासाठी पश्चाताप करण्याची पाळी आली आहे. सदर अनुदान मिळेल याची खात्री नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. या शेतकऱ्यांनी नियमाप्रमाणे शेततळे खोदले आहे का ? याची खात्री करून एकदाच अनुदान घेत असल्याच्या अटीवर अनुदान देणे गरजेचे आहे. मात्र तसा विचार कृषी खाते करताना दिसत नाही. शेतीसाठी पाणी साठवणुकीची गरज लक्षात घेता व सरकारी अनुदान मिळेल, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी शेततळे खोदले, मात्र अनुदान मिळणे बेभरवशाचे ठरले आहे. 'ऑनलाईन नोंदणी' करीत कृषी विभागाच्या नियमाप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी स्वता खर्च करून शेततळे खोदले. ज्यांनी पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा शेतकऱ्यांना अनुदान न देण्याचा प्रकार अन्यायकारक आहे.

अनुदान देण्याची मागणी...
ऑनलाईन नोंदणी करून शेततळे खोदणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनकर चत्तर यांनी केली आहे.

Web Title: Nagar news farm pond in nagar