विषमुक्त अन्न निर्माण करण्याची गरज: कृषीतज्ज्ञ ज्ञानेश्वर बोडके

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

शेतकऱ्यांना कानमंत्र !
कमी पाण्यावर किफायतशीर शेती कशी करावी व शेतीमालाचे ब्रँडिंग व मार्केटिंग कसे करावे याचा कानमंत्र कृषीतज्ञ ज्ञानेश्वर बोडके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

तळेगाव दिघे (जि. नगर) : शेती ही आपली संस्कृती असून यापुढे शेतावर जावून संशोधन झाले पाहिजे. उत्पादन वाढल्यावर भाव पडतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी गरजेच्या प्रमाणात उत्पादन घ्यावे. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून विषमुक्त अन्न निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे विचार अभिनव फार्मस् क्लबचे अध्यक्ष व कृषीतज्ञ ज्ञानेश्वर बोडके यांनी व्यक्त केले.

पिंपळे ( ता. संगमनेर ) येथे ग्रामपंचायत व सप्तरंग सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित 'शेती हाच उद्योग' विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, स्व. वसंतराव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष इंजि. बी. आर. चकोर, सरपंच भाऊपाटील कोटकर, कृषी पर्यवेक्षक शिवाजी गवारे, सुहास गोव्हींगे, राधाकिसन गुळवे, अनिल घुगे, टी. आर. ढोले, एकनाथ चकोर, शिवनाथ चकोर, संदीप चकोर, नामदेव कोटकर, रामदास कोटकर उपस्थित होते.

बोडके म्हणाले, जगाचे पोट भरणारा शेतकरी देशात कायम गरीबच आहे. याविषयी शेतकऱ्यांनी देखील आत्मचिंतन करावे. शेती हे शास्र असून शेतकऱ्यांनी उद्योग समजून फ्याद्याची शेती करावी. विषमुक्त अन्न, भाजीपाला, दुधाची निर्मिती करावी. शेतीलाच स्वर्ग बनवून स्वावलंबी बनावे. शेतकऱ्यांनी व्यवस्थेप्रमाणे बदलायला शिकावे. शेती मालास बाजारपेठ शोधून मार्केटिंग करावे. सध्या मजुरावर ७० टक्के खर्च केला जातो, हे दुर्दैव असून स्वता श्रम करण्याची तयारी ठेवायला हवी. शेतीमध्ये व्यवसायिकता आणावी. दलाल टाळून थेट ग्राहकांना शेतीमालाची विक्री करावी, असा सल्ला दिला.

प्रसंगी तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, राधाकिसन गुळवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक इंजि. बी. आर. चकोर यांनी केले. सूत्रसंचालन संदीप चकोर यांनी केले. आभार शिवनाथ चकोर यांनी मानले.

शेतकऱ्यांना कानमंत्र !
कमी पाण्यावर किफायतशीर शेती कशी करावी व शेतीमालाचे ब्रँडिंग व मार्केटिंग कसे करावे याचा कानमंत्र कृषीतज्ञ ज्ञानेश्वर बोडके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

Web Title: Nagar news farmer advise