अधिकाऱ्यांनी हवी तशी कागदपत्रे तयार केली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नगर - कोपर्डी येथील अत्याचार व खून खटल्यातील कागदपत्रे तयार करताना सरकार पक्ष, तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी हेळसांड केली. अधिकाऱ्यांनी पदाचा वापर हवी तशी कागदपत्रे तयार करण्यासाठी केल्याचे दिसून येते. अनेक बाबींमध्ये तफावत आढळून आली आहे. दोषारोपपत्रातही अनेक त्रुटी आहेत, असा दावा आरोपी जितेंद्र शिंदेचे वकील योहान मकासरे यांनी सोमवारी युक्तिवाद करताना केला. खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, असे म्हणणे त्यांनी मांडले.

विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर अंतिम युक्तिवाद सुरू आहे. मकासरे म्हणाले, 'घटनेनंतर पीडितेच्या वस्तू विखुरलेल्या होत्या; मात्र त्यात किती अंतर होते, हे साक्षीदाराला सांगता आले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिस येण्याआधीच तपासणी करून पीडितेच्या अंगावर सोळा जखमा असल्याचे सांगून टाकले. तपासणीआधीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना शरीराच्या आतील जखमा कळल्या कशा? पीडित मुलगी नेमकी कोठे मृत्यू पावली, हेही सांगितले नाही.''

तपासी अधिकाऱ्यांनी एका जागी बसून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तयार केली. नगरला बसूनच अधिकाऱ्यांनी तपास केला. दोषारोपपत्रातच अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे म्हणणे मकासरे यांनी मांडले.

Web Title: nagar news kopardi rape case