नगर: समनापूर भागात बिबट्यांचा मुक्तसंचार

हरिभाऊ दिघे
सोमवार, 24 जुलै 2017

शेतातील काम जिकरीचे..
समनापूर परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरु असून दिवसा व रात्री बिबट्यांचे दर्शन होवू लागल्याने शेतात काम करणे जिकरीचे बनले आहे. बिबट्याच्या धास्तीने शेतमजूर कामावर येण्यास तयार नाहीत. शेतकऱ्यांनी बिबट्यांची धास्ती घेतली आहे.

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील समनापूर पंचक्रोशीत बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु आहे. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा बळी गेलेला आहे. थेट माणसांवर हल्ल्याच्या घटना सुरु असून बिबट्यांनी अनेक शेळ्या ठार केल्या आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यांनी पशुधन संकटात सापडले असून ग्रामस्थांवर दहशतीच्या सावटाखाली आहेत.

समनापूर शिवारात रविवारी पहाटे मनसुब यशवंत हासे नामक शेतकऱ्याच्या दोन शेळ्या ठार करीत त्यांचा फडशा पाडला. काही दिवसांपूर्वी याच शिवारात बिबट्यांनी सलग दोन दिवस हल्ले करून शेळ्यांची शिकार केली होती. बिबट्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. दिवसा उसाच्या शेतामध्ये दबा धरून बसलेले बिबटे रात्री शिकारीसाठी निघतात. जनावरांचे गोठे ते टार्गेट करतात. शेतातील वस्त्यांवरील रहीवाशांवर देखील अनेकदा हल्ले करतात. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी वाहनावरील प्रवाशांवर बिबटे हल्ले करतात.

बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांनी शेतकरी हतबल झाले असून पशुधन संकटात सापडले आहे. वन विभागाने एखादा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद केला तरी लगेच इतर बिबटे दाखल होतात. बिबट्यांच्या धास्तीने अनेकांनी शेतातील घरांना तारेचे कुंपण घातले आहे. वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

शेतातील काम जिकरीचे..
समनापूर परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरु असून दिवसा व रात्री बिबट्यांचे दर्शन होवू लागल्याने शेतात काम करणे जिकरीचे बनले आहे. बिबट्याच्या धास्तीने शेतमजूर कामावर येण्यास तयार नाहीत. शेतकऱ्यांनी बिबट्यांची धास्ती घेतली आहे.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: Nagar news leopard in samnapur