राहत्या घरातून ४७ हजारांची देशीदारू जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

हरिभाऊ दिघे
रविवार, 30 जुलै 2017

  • धांदरफळ बुद्रुक येथे पोलिसांचा छापा
  • तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

तळेगाव दिघे (जि. नगर)  : संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने धांदरफळ बुद्रुक गावानजीक असलेल्या राहत्या घरावर छापा टाकत ४७ हजार ४२४ रुपये किंमतीचे बॉबी संत्रा देशीदारूचे बेकायदा ठेवलेले १९ बॉक्स जप्त केले. रविवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

धांदरफळ बुद्रुक (ता. संगमनेर) शिवारात बेकायदा विक्रीसाठी देशीदारूचे बॉक्स उतरविल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या नेतृत्वाखाली हे. कॉम्रेड व्ही. के. आहेर, पोलिश काँस्टेबल कैलास शिरसाठ, यमना जाधव, रत्नपारखी यांच्या पथकाने बुधवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास धांदरफळ बुद्रुक गावानजीक असलेल्या अण्णासाहेब गंगाधर वलवे यांच्या घरावर पोलीस पथकाने छापा टाकला.

या घरातून ४७ हजार ४२४ रुपये किंमतीचे बॉबी संत्रा दारूचे १९ बॉक्स जप्त केली. अमेय माधव मुळे व महेश बबन खंडागळे यांनी एका वाहनातून सदर दारूचे बॉक्स विक्रीच्या उद्देशाने अण्णासाहेब वलवे यांच्या घरात ठेवले होते. छापा टाकेपर्यंत काही बॉक्स लंपास करण्यात आले होते. आरोपी अण्णासाहेब गंगाधर वलवे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघेजण पसार झाले आहेत. आरोपी अमेय मुळे व महेश खंडागळे (रा. धांदरफळ बुद्रुक) पसार झाले. याप्रकरणी अनिल जाधव यांनी फिर्याद दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर दारू कोणत्या वाहनातून व कोठून आणली व कोठे विक्री केली जाणार होती? याचा पोलीस तपास करीत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: nagar news liquor seized from household