अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खून : तिघे आरोपी दोषी

सूर्यकांत नेटके
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

लोणीमावळा खटला; उद्या निकाल होणार जाहीर

लोणीमावळा (ता. पारनेर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केले यांनी आज तीनही आरोपींना दोषी ठरवले आहे. उद्या आरोपी पक्षातर्फे शिक्षेबाबत अंतिम युक्तिवाद केल्यानंतर न्यायालय शिक्षा जाहीर करणार आहे. या खून खटल्यात अॅड.  उज्ज्वल निकम यांनी शिक्षेबाबत युक्तिवाद केला. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खून केल्याप्रकरणीचा निकाल अंतीम टप्प्यात आहे. त्यापार्श्वभूमीवर लोणीमावळा प्रकरणाचा निकाल जाहीर होत असल्याने याला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

लोणीमावळा तालूका पारनेर येथे 22 आॅगस्ट 2014 रोजी शाळकरी मुलीचा तिघांनी बलात्कार करून खून केला होता. निघृण पद्धतीने शाळकरी मुलीचा खून झालेला असतानाही हा खटला सुरुवातीच्या काळात आरसा गाजला नाही. शाळकरी मुलीवर अत्याचार करून खून झालेला असतानाही सरकार पक्षाकडून फारशी गंभीर दखल घेतली नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या खटल्यात अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने खटल्यात निकम यांची डिसेंबर 2014 ला नियुक्ती केली. 18 नोव्हेंबर  2014 रोजी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले तर 1 जुलै 2015 पासून सुनावणी सुरू झाली. 7 जुलै 2017 रोजी सुनावणी संपली. 

या खटल्यात एकूण 32 साक्षीदार तपासण्यात आले. घटनेचा प्रत्यक्षदर्शी जे कही साक्षीदार नव्हता मात्र निकम यांनी 24 परिस्थितीजन्य, पुराव्याची साखळी न्यायालयात सादर केली. सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे आणि अन्य बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपी संतोष लोणकर,  मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे यांना बलात्कार, खून व त्यासाठी कट करणे या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे. एका आरोपीचे वकील न्यायालयात हजर नसल्यामुळे उद्या मंगळवारी आरोपीच्या वकिलांतर्फे न्यायालयात बाजू मांडली जाणार आहे. त्यानंतर न्यायालय शिक्षा जाहीर करणार आहे असे अॅड. निकम यांनी सांगितले. आरोपीतर्फे अॅड. राहुल देशमुख, अॅड. अनिल आरोटे, आणि अॅड. परिमल फळे, अॅड. प्रितेश खराडे काम पहात आहेत. 

हजारे यांनी केले अभिनंदन
लोणीमावळा येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती  करावी अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केली होती. तीनही आरोपींना या प्रकरणी न्यायालयाने आज दोषी ठरवले. त्यानंतर अॅड. निकम यानी दूरध्वनीवरून हजारे यांना माहिती दिली. हजारे यांनी या प्रकरणात आरोपीला दोषी धरल्याबद्दल निकम यांचे अभिनंदन केले. कोपर्डी खटलाही अंतिम टप्प्यात आहे या महिन्याभरात त्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे शक्यता आहे. दोन्हीही खटले सारखेच असल्याने लोणीमावळा खटल्याला ही महत्त्व प्राप्त झाले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: nagar news lonimavla rape case accused convicted