मोदी सरकारला सद्‌बुद्धी मिळो; राळेगणकरांचे खंडेरायाला साकडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

टाकळी ढोकेश्वर - लोकपाल व लोकायुक्त नियुक्ती, शेतमालाला दर, यांसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धी येथे आज सकाळी ग्रामस्थांनी प्रभातफेरी काढली. मोदी सरकारला सद्‌बुद्धी मिळो व हजारे यांच्या मागण्या मान्य करून लवकर उपोषण सुटावे, यासाठी यादवबाबा मंदिरात जागरण गोंधळ घालून खंडेरायाला साकडे घालण्यात आले.

अण्णांच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता आहे. ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू आहे. उपसरपंच लाभेश औटी, विठ्ठल मापारी, ज्ञानेश्वर हावळे यांचेही बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यांचीही प्रकृती बिघडली आहे. मात्र, हजारे यांचे उपोषण सुरू आहे, तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

दरम्यान, हजारे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पारनेर तालुक्‍यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने उद्या (ता. 26) सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

Web Title: nagar news modi government anna hazare lokpal bill