ज्येष्ठ भाजप नेते प्रा. फरांदे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

नगर - विधान परिषदेचे माजी सभापती, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण सदाशिव तथा प्रा. ना. स. फरांदे (वय 79) यांचे आज सकाळी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी मंगल, मुलगा व तीन मुली असा परिवार आहे.

नगर - विधान परिषदेचे माजी सभापती, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण सदाशिव तथा प्रा. ना. स. फरांदे (वय 79) यांचे आज सकाळी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी मंगल, मुलगा व तीन मुली असा परिवार आहे.

जन्मभूमी सातारा जिल्ह्यातील असली, तरी प्रा. फरांदे यांची कर्मभूमी नगर जिल्हाच राहिली. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळविल्यानंतर त्यांनी नगरसह धुळे, नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यांत भारतीय जनता पक्षाच्या संघटनासाठी मोठे प्रयत्न केले. पक्ष भाजप असला, तरी विविध पक्षांतील प्रमुख नेत्यांसमवेत त्यांचे सलोख्याचे संबंध होते. विधान परिषदेत त्यांनी विविध प्रश्‍नांवर केलेली भाषणेही गाजली. कालांतराने त्यांनी विधान परिषदेचे सुरवातीला उपसभापतिपद व नंतर सभापतिपद सांभाळले.

प्रा. फरांदे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील ओझर्डे (ता. वाई) येथे 18 ऑक्‍टोबर 1939 रोजी झाला. राजकारणात आणि समाजकारणात त्यांनी केलेल्या कामामुळे सर्व समाजघटकांसाठी ते जवळचे झाले. "फरांदे सर' म्हणूनच त्यांना ओळखले जात असे. नगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मुंबईमध्ये महत्त्वाचा आधार म्हणजे फरांदे सर, असे समीकरण होते. ते तीन वेळा विधान परिषदेचे सदस्य होते. त्याचबरोबर साईबाबा संस्थानाचे विश्‍वस्त, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य, राज्य रोजगार हमी योजना समितीचे सदस्य ही महत्त्वाची पदे सांभाळली. भाजपमध्ये त्यांनी कोपरगाव तालुकाध्यक्षापासून जिल्हाध्यक्ष आणि नंतर प्रदेशाध्यक्षपदापर्यंत जबाबदारी सांभाळली. "पुक्‍टो' संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते.

Web Title: nagar news narayan bjp senior leader sadashiv farande death