संगमनेर: तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

हरिभाऊ दिघे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

महेश ज्ञानदेव पवार असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे. भाऊबीजेच्या दिवशी शनिवारी ( दि. २१ ) दुपारी दीडच्या सुमारास शिवारात ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे दिवाळी सणाच्या निमित्ताने मामाच्या घरी आलेल्या अकरावीत शिकणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा तलावातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

महेश ज्ञानदेव पवार असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे. भाऊबीजेच्या दिवशी शनिवारी ( दि. २१ ) दुपारी दीडच्या सुमारास शिवारात ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कौठेकमळेश्वर येथील संजय कोंडाजी मोरे यांच्याकडे दिवाळी निमित्ताने महेश ज्ञानदेव पवार ( वय १६ रा. संगमनेर ) हा मुलगा कुटुंबीया समवेत आलेला होता. तो दुपारी मुलांसोबत पोहण्यासाठी तलावाकडे गेला असता पाण्यात बुडून त्याचा जागीच मृत्यू झाला. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाच्या खबरीनुसार याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक जांभूळकर अधिक तपास करीत आहे. उत्तरीय तपासणी नंतर महेश याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. महेश हा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पो. हे. कॉ. ज्ञानदेव पवार यांचा मुलगा आहे. पवार कुटुंबीय शनिवारी दिवाळी सणानिमित्त कौठेकमळेश्वर येथे आलेले होते. दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. महेश पवार हा अकरावीत शिकत होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Nagar news one youth drown in lake