श्रीगोंद्यातील काही खड्डे चार दिवसात उखडले

संजय आ. काटे 
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. मात्र खड्डे वाहनचालकांसाठी बुजवितात की पैसे काढण्यासाठी असा प्रश्न विचारला जात आहे. खड्डा अगोदर साफ करुन खाली डांबराचा फवारा, त्यावर मोठी खडी पुन्हा डांबर व नंतर छोटी खडी टाकण्याचा नियम आहे.

श्रीगोंदे (नगर) : तालुक्यातील बहुतेक रस्ते खड्यांनी व्यापल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ सुरु आहे. रस्त्यांवरचे डांबर कमी आणि खड्डे जास्त झाल्याने वाहने कशी चालवायची याचे कोडे ऊस वाहतूक करणाऱ्यांना सतावते आहे. सध्या खड्डे बुजविण्याची सुरु असणारी मोहिम म्हणजे खड्यांना काडीने औषध (डांबर) लावण्याचा धंदा सुरु आहे. नियम बाजूला ठेवून खड्डे बुजविले जात असून काही खड्डे तर लगेच उखडले असल्याने सगळाच गोंधळ समोर आला आहे. 

तालुक्यात यंदा झालेल्या दमदार पावसाने बहुतेक रस्ते उखडले आहेत. रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असतानाच अनेक रस्ते खचले आहेत. सध्या कारखान्यांचे हंगाम सुरु झाल्याने उसाची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची कसरत होत असून त्यांच्यामुळे इतर वाहन चालकांचीही चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यातच खड्डे असल्याने अडचणीत अजूनच भर आहे. 

सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. मात्र खड्डे वाहनचालकांसाठी बुजवितात की पैसे काढण्यासाठी असा प्रश्न विचारला जात आहे. खड्डा अगोदर साफ करुन खाली डांबराचा फवारा, त्यावर मोठी खडी पुन्हा डांबर व नंतर छोटी खडी टाकण्याचा नियम आहे. यादरम्यान दोनवेळा खड्यावर रोलर फिरविला पाहिजे. मात्र सध्या थेट खड्यात मोठी खडी, त्यावर थोडे डांबर व लगेच छोटी खडी टाकुन खड्डा भरला जात आहे. अनेक ठिकाणी त्यावर रोलर फिरविलाही जात नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे अर्धवट भरले गेले असून श्रीगोंदे रेल्वे स्टेशन ते श्रीगोंदे या दरम्यान काही ठिकाणी नव्याने भरलेले खड्डेही उचकटले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा वाहनचालांकाना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. 

तालुक्यात रस्त्यावरचे खड्डे बुजविताना गोंधळ सुरु असतानाच शहरातही वेगळे नाही. शहरातील खड्डे बुजविताना मातीचा वापर केला जात असल्याने नागरीकांमध्ये चांगलाच असंतोष आहे. अगोदरच शहरातील रस्त्यांवरुन वादंग झाले असताना आता या मातीची भर पडली आहे. 

कोण काय म्हणाले...
1. दर्जेदार पध्दतीने खड्डे भरण्यास सांगण्यास आले असून तालुक्याकतील खड्यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजे पन्नास लाखाचा खर्च अपेक्षीत आहे. ज्या ठिकाणी खड्डे व्यवस्थितीत भरले नाही तेथे पाहणी करु.- गौतम बनकर, उपअभियंता
2. खड्डे भरताना नियमांना बगल देत खड्यांतूनही पैसे उकळण्याचा धंदा होत असून खड्डे चांगले भरले नाहीत तर अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाहीत. 
सतीश बोरुडे, शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड.
3. पालीका हद्दीतील खड्डे बुजविण्यासाठी निधीची तरतुद नाही. त्यामुळे शहरातील खड्डे मुरुमांनी भरले जात आहेत. शहराहाबेर जाणाऱ्या रस्त्यांचे खड्डे खडी व डांबराने भरण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. - धनंजय कोळेकर, मुख्याधिकारी.
4. शहरातील डांबरी  रस्त्यावरील खड्डे मुरुमाने नव्हे तर शाडूच्या मातीने भरले जात आहेत. अगोरदच शहरात धुळीचा मोठा त्रास असून त्यात आता ही खड्यांची धूळ होणार असल्याने पालीकेने डांबरानेच खड्डे बुजवावेत. 
सुदाम कोथिंबीरे, व्यवसायिक..

Web Title: Nagar news potholes in shrigonda

टॅग्स