देशाची वाटचाल आणीबाणीच्या दिशेने: रामदास फुटाणे

Ramdas Phutane
Ramdas Phutane

नगर : देशातील वातावरण पाहता, आणीबाणीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसते. माध्यमांमधून शासनाविरुद्ध बोलणाऱ्यांना घरी पाठविले जाते. हा प्रकार साहित्यिकांपर्यंत येण्याची शक्‍यता आहे. माणसातील पशुत्व वाढत चालले आहे, अशी खंत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी आज व्यक्त केली. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेतर्फे आयोजित पहिल्या विभागीय साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी फुटाणे बोलत होते. या वेळी संमेलनाध्यक्ष रंगनाथ पठारे, महापौर सुरेखा कदम, प्रशांत गडाख, स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, संयोजक जयंत येलूलकर आदी उपस्थित होते. 

फुटाणे म्हणाले, ""वाचनामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते. माणसातील पशुत्व वाढत चालल्याने साहित्य संमेलनाची समाजाला गरज आहे. बैल घोड्यासारखा पळू शकतो का? मात्र, त्यासाठी सरकारने कमिटी नेमली. इंग्रजी माध्यमातून आलेले अधिकारी काय करतील याचा नेम नाही. राज्यकर्ते प्रत्येकाकडे मतदार म्हणून पाहतात, माणूस म्हणून नाही. माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची जबाबदारी साहित्यिकांनी घ्यावी. हिंसाचार, अत्याचार पाहता देश कोणत्या दिशेने चाललाय, याची जाणीव संमेलनातून झाली पाहिजे.'' 

संमेलनाध्यक्ष पठारे म्हणाले, ""देशात दोन औद्योगिक घराणे सांस्कृतिक संघटनांवर ताबा मिळवित असतील, तर ते धोकादायक आहे. एका आवाजाविरोधात दुसरा आवाज निघण्याआधीच गळा दाबला जाईल, अशा सूचना दिल्या जातात. देशाचा विचार करताना भाषेचा त्याग करण्यासाठी तयार राहणे आवश्‍यक आहे. गप्प राहिलात, तर येणारा काळ माफ करणार नाही.'' 

आपण भाजपविरोधी नाही; पण भाजप चुकीचे करीत असेल, तर त्याला विरोध करण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे, असे सांगून पठारे म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करतो; पण ते काही चुकीचे करीत असल्यास त्याला प्रतिकार करणे आवश्‍यक आहे. निरोगी लोकशाहीत वेगवेगळे आवाज व्यक्त व्हायला हवेत. विशिष्ट जाती-धर्माबाबत विष पेरले जात आहे. ते आपल्या संस्कृतीला धोकादायक आहे.'' 

राजकीय नेत्यांची पाठ 
संमेलनासाठी राजकीय नेत्यांमधून केवळ महापौर सुरेखा कदम उपस्थित होत्या. पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, खासदार दिलीप गांधी, आमदार संग्राम जगताप यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com