नगर : वाळू तस्करीसाठी 'भाडोत्री' ट्रॅक्टरचा वापर!

हरिभाऊ दिघे
सोमवार, 31 जुलै 2017

ट्रॅक्टर भाड्याने देवू नये 
अवैध वाळू वाहतुकीसाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर भाड्याने दिल्यास ते कधी ना कधी पकडले जातात व मालकावरच कारवाई होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर अधिक भाड्याच्या लालसेने वाळू वाहतुकीसाठी भाड्याने देवू नयेत.
- बाबा ओहोळ, तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, संगमनेर

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यासहित सर्वत्र वाळू विक्रीचा व्यवसाय जोरात आहे. नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची चोरी व तस्करी केली जाते. या व्यवसायात गुंतलेले माफिया वाळू तस्करीसाठी भाडोत्री ट्रॅक्टरचा वापर करतात. महसूल अथवा पोलीस वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टर पकडतात, त्यावेळी ट्रॅक्टर मालकावरच कारवाई होते. वाळू माफिया मात्र सहिलसलामत राहत असल्याचे उघड होत आहे.

संगमनेर तालुक्यातील प्रवरा व मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक केली जाते. वाळू वाहतुकीसाठी जादा भाडे देवून शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर वापरतात. जादा भाडे मिळत असल्याने अनेक शेतकरी या मोहाला बळी पडतात. विनापरवाना अवैध वाळू वाहतुकीसाठी भाडोत्री ट्रॅक्टरचा वापर होते. त्यात क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरलेली असते. शासनाची रॉयल्टी बुडवून बेकायदा वाळू वाहतूक करणारे वाहने महसूल व पोलिसांच्या रडारवर असतात. प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले जातात, तेव्हा कारवाई मालकावरच होते. त्यांनाच प्रतिज्ञापत्र द्यावे लागते, दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. काही शेतकऱ्यांना याप्रकाराने तडीपार होण्याची वेळ आलीय.

झपाट्याने होणाऱ्या बांधकामांसाठी वाळूची गरज असते, त्यामुळे वाळूला सोन्याचे मोल मिळत आहे. वाळू व्यवसाय झटपट पैसा मिळवून देणारा बनला आहे. राजकीय क्षेत्रातील बड्या हस्ती या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून अवैध वाळू व्यवसायासाठी भाडोत्री ट्रॅक्टरचा वापर सुरु असून आतापर्यंत अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. वाळू माफिये मात्र कारवाईपासून सहिलसलामत दूर राहत आहेत.

ट्रॅक्टर भाड्याने देवू नये 
अवैध वाळू वाहतुकीसाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर भाड्याने दिल्यास ते कधी ना कधी पकडले जातात व मालकावरच कारवाई होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर अधिक भाड्याच्या लालसेने वाळू वाहतुकीसाठी भाड्याने देवू नयेत.
- बाबा ओहोळ, तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, संगमनेर

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Nagar news sand mafia use tractors